सरकारी कामात अडथळा : चाळीसगावच्या आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा

जळगाव : सरकारी कामात अडथळा निर्माण करणार्‍या भाऊसाहेब त्र्यंबक पाटील (रा.चाळीसगाव) या आरोपीला सहा महिन्याची सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. व्ही. बी. बोहरा यांनी सुनावली.

संशयीत आरोपीला पळवून नेण्याचा केला होता प्रयत्न
दत्तात्रय नाना पाटील (भामरे, ता.चाळीसगाव) याच्यावर पाचोरा न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल असल्याने त्याच्याविरोधात 26 ऑक्टोबर 2019 रोजी पकड वारंट जारी करण्यात आले होते. हवालदार सुभाष भीमराव पाटील यांनी संशयीत आरोपी दत्तात्रय पाटील याला अटक करून चाळीसगाव पोलीस ठाण्यात आणत असतांना आरोपी भाऊसाहेब त्र्यंबक पाटील याने पोलिसाची अडवणूक करून दत्तात्रय पाटील याला अटक करू नका, नाहीतर तुम्हाला महागात पडेल, मी तुमच्याविरूध्द खोटेनाटे अर्ज करून बदनामी करेल, अशी धमकी देवून आरोपी दत्तात्रय पाटील याला पोलिसांच्या ताब्यातून हिसकावून पळवून नेल्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. याप्रकरणी चाळीसगाव पोलीसात भाऊसाहेब पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा न्यायालयात चालला खटला
या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील न्या.व्ही.बी.बोहरा यांच्या न्यायालयात सुरू होता. खटल्याची सुनावणी शुक्रवार, 7 जानेवारी करण्यात आली. यात सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. यात पोलिस कॉन्स्टेबल सुभाष पाटील व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. न्या.बोहरा यांनी आरोपी भाऊसाहेब पाटील याला दोषी ठरवत सहा महिन्याची सक्त मजूरीची शिक्षा आणि दीड हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.भारती खडसे यांनी काम पाहिले तर केस वॉच म्हणून हवालदार दिलीप सत्रे व पैरवी अधिकारी जरीना तडवी यांनी काम पाहिले.