सरकारी कार्यालयांत २४ डिग्रीच्यावर एसीचे तापमान नको!

0

सरकारी कार्यालयांमध्ये एसीसाठी अनावश्यक विजेचा अपव्यय

एसीचा सुयोग्य वापर करण्याबाबत राज्यातील सर्व कार्यालयांना सूचना

निलेश झालटे, मुंबई:- महाराष्ट्र शासनाच्या राज्यातील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात एसी अर्थात वातानुकुलीत यंत्रणेचा वापर होत आहे. राज्यात बऱ्याच सरकारी कार्यालयात एसींचे तापमान कमी ठेवल्याने सरकारचे आर्थिक नुकसान होत असून सोबतच उर्जा निर्माण करणाऱ्या स्त्रोतांचा देखील अधिक प्रमाणात अनावश्यक वापर होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची कबुली सरकारने दिली आहे. अनेक ठिकाणी तापमान 18 ते 20 डिग्री से.असे तापमान ठेवण्यात येते. त्यामुळे अनावश्यक वीजेचा वापर होत असल्याचे निर्दशनास आले आहे.

केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी ईफिशीयन्सी (BEE) व्दारे असे सूचित करण्यात आले आहे की, वातानुकुलीत यंत्रणा 24 डिग्री से.तापमानावर वापरल्यावर 24% विजेची बचत होऊ शकते व हे तापमान मानवी शरीराला आवश्यक आर्द्रता आणि योग्य हवेचे अभिसरण करण्याकरीता सर्वोत्तम आहे. यामुळे बाहेरुन येणा-या व्यक्तींना तापमानातील विषम बदलाला सामोरे जावे लागत नाही. सदर तापमान वातावरणास पोषक व ग्रीन बिल्डींग संकल्पनेस पूरक राहील असे म्हटले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने सर्व कार्यालयांना एसीच्या सुयोग्य वापराबद्दल शासन निर्णय काढून निर्देश दिले आहेत.

शासकीय कार्यालये आणि विश्रामगृह तसेच अन्य सरकारी इमारतींमधील सर्व वातानुकुलीत यंत्रे तसेच यंत्रणेचे तापमान 24 डिग्री तापमान ठेवण्यात यावे. हे तापमान 24 डिग्री राहील असे सुनिश्चित करावे, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहे. अशा प्रकारे वातानुकुलीत यंत्रणेचा सुयोग्य वापर केल्यास उर्जा निर्माण करणाऱ्या स्त्रोतांचा मर्यादित वापर होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभर लावता येईल व पर्यायी शासनाची आर्थिक बचत होईल, असे देखील निर्णयात म्हटले आहे.