सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍यांना केले जेरबंद

0

ठाणे । सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. नाशिकमधील दिलीप पाटील यांचा मुलगा मयुर पाटील आणि इतर अनेक सुशिक्षित बेरोजगार मुलांना पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीस लावतो असे सांगून दिनेश लहारे याने साडेसतरा लाखांची फसवणूक केली होती. त्यांना पैसे देणार्‍या कोणालाच त्यांनी नोकरी न लावता पैसेही परत दिले नाही म्हणून त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकानं दिनेश लहारे हा गणेश टॉकीजजवळ येणार असल्याची माहिती मिळवली होती. त्यानुसार आलेल्या दिनेश लहारेला अटक करण्यात आली.

विविध विभागांचे 33 शिक्के हस्तगत
लहारेने सुशिक्षित बेरोजगार तरूणांना नोकरीचे आमिष दाखवले. रेल्वे, जलसिंचन, सार्वजनिक बांधकाम विभाग, सेल्सटॅक्स, प्रादेशिक परिवहन कार्यालय, टपाल, पोलीस, वीज अशा विभागांमध्ये कनिष्ठ लिपिक, हेल्पर, शिपाई, पोलीस उपनिरिक्षक, अभियंता अशा पदांसाठी नियुक्तीचे आमिष दाखवून त्याने आत्तापर्यंत 31 उमेदवारांची लाखांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने आणखी 30 उमेदवारांची फसवणूक केल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या विभागांतील नियुक्त्यांची पत्र, उच्चस्तरीय अधिकार्‍यांचे शिक्के, खोट्या सह्या, शासनाच्या विविध विभागांचे 33 शिक्के हस्तगत करण्यात आले आहेत. लहारे याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून विनय दळवी, शंकर कोळसे-पाटील, रमेश देवरे, प्रवीण गुप्ता अशा चौघांना अटक करण्यात आल्याचं अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी यावेळी सांगितले.