’सरकारी बँकां’ की लुटीचे ’कुरण’?

0

महाठग मल्ल्याच्या पावलावर पाऊल ठेवून नीरव मोदी, कोठारी यांच्या कर्ज प्रकरणाने संपूर्ण देशातील वातावरण मागील काही दिवसांपासून वातावरण ढवळून निघाले आहे आणि देशभरातील बँकांच्या कार्य पद्धतीवरच एक मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. बँकांमध्ये होणार्‍या करोडो रुपयांच्या घोटाळ्यांचे आकडे वाचून सर्वसामान्य जनतेच्या मनात तर धडकीच भरते. मोठमोठ्या रकमांचे कर्ज बँकांकडून विशेषतः सरकारी बँकाकडून काढायचेच आणि तोच पैसा इतर्रस्त्र वळवून आपली संपत्ती वाढवायची आणि धंदा तोट्यात आल्याचे दाखवून बँकांचे कर्ज बुडवायचे किंवा कर्जमाफी करून घ्यायची, अशी कार्यपद्धतीच झाली आहे. यात नक्कीच काही भ्रष्टाचारी प्रवृत्तींच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकार्‍यांची साथ आणि शासन व्यवस्थेतील भ्रष्ट नोकरशहांचे पाठबळ असल्याशिवाय करोडो रुपयांचे घोटाळे घडणे शक्य नाही आणि हेच तथाकथित कुप्रसिद्ध घोटाळेबाज, समाजातील मोठे उद्योगपती म्हणून वावरत असतात आणि नंतर चोरी उघड झाल्यावर देशाबाहेर पळून जातात. खासगी बँकांपेक्षा सरकारी बँकांची अशी लूट मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. दिवसेंदिवस बँकांचे वाढत जाणारे एनपीएचे आकडे वाढत आहे. पण दुर्दैवाने या सगळ्यात त्याची किंमत मात्र कररूपाने सामान्य माणसालाच मोजावी लागते.

तीन-चार वर्षांपूर्वी सत्ताबदलानंतर, अब अच्छे दिन आ गये, ना खाऊंगा ना खाने दुंगा, अशा लोकलुभावण्या घोषणा ऐकून देशातील सामान्य जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. काँग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीला कंटाळून देशात एकहाती सत्ता भाजपला मिळाली. मात्र, आता जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. मल्ल्याने नऊ हजार कोटी रुपयांना देशाला गंडा घातला आणि आत्ता त्याच्याच जातकुळीतल्या नीरव मोदी याने सुमारे अकरा हजार तीनशेसाठ कोटी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पलायन केले. सत्तेवर येताना देशाबाहेर गेलेला काळा पैसा परत आणायचे आश्‍वासन तर हवेतच विरले आणि तो एक चुनावी जुमला होता, असेही सांगून मोकळे झाले. मात्र, आता देशाचा पैसा लुटून राजरोस पलायन करणारेच दिसत आहे. सामान्य जनतेचा कष्टाचा पैसा कुठेही सुरक्षित राहिला नाही. मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेची चहूकडून आर्थिक पिळवणूक होत आहे आणि मोठमोठ्या घोटाळेबाजांना मात्र राज्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असोत, त्यांना मात्र पाठीशी घातले जात आहे.

आतापर्यंत देशात अनेक घोटाळ्यांच्या फक्त सुरस कहाण्या जनतेला ऐकायला मिळाल्या. मात्र, दोषींना शिक्षा होऊन, पैसे परत मिळाल्याचे काही दिसत नाही. नेहमीप्रमाणे चौकशीचे नाटक होईल काही खालच्या अधिकार्‍यांना बळीचा बकरा बनवले जाईल आणि परत हेच महाठग, देशातील प्रतिष्ठित उद्योगपती म्हणून मिरवतील. देशातील काही भ्रष्टाचारी प्रवृत्तींच्या राजकारण्यांनी, नोकरशहा आणि दलाल यांनी चालू केलेली भरमसाट लुटमारीला आळा बसण्याची काही चिन्हे दिसत नाही. काही भ्रष्ट कर्मचारी, अधिकारी, नोकरशहा यांच्याशी अभद्र युती करून बँकांच्या लुटमारीचा हा उद्योग अविरत सुरूच आहे. निदान आता नीरव मोदीच्या या बँक घोटाळ्यांच्या निमित्ताने सर्व दोषींना कठोर शिक्षा होऊन भविष्यात अशा घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा ठेवायला हवी.

अनंत बोरसे
शहापूर, जिल्हा ठाणे