माहिती अधिकाराचा दणका ; भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासच्या पदाधिकार्यांच्या तक्रारीची दखल
यावल- राज्याचे माजी माहिती आयुक्त तथा जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता वसंत दत्तात्रय पाटील यांना जळगांव येथील शासकीय निवासस्थानात राहिल्यापोटी तब्बल चार लाख 22 हजार 59 रुपये भरावे लागल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे जळगांव जिल्ह्याचे संघटक सुरेश जगन्नाथ पाटील (रा.यावल) यांनी 9 जुलै 2018 रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव यांच्याकडे तक्रार केली होती. माहितीच्या अधिकारंतर्गत 2 जानेवारी 2019 रोजी मिळालेल्या माहितीनुसार कार्यकारी अभियंता लघू पाटबंधारे विभाग, जळगांव यांच्याकडे पाटील यांनी दोन वेळा शासकीय घरभाडे भरले असल्याचे उघड झाले आहे. राज्यातील माजी राज्य माहिती आयुक्तांनाही माहिती अधिकाराचा दणका बसल्याची चर्चा आहे.
शासकीय निवासस्थानावर अनधिकृत कब्जा
माजी राज्य माहिती आयुक्त तथा जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व्ही.डी.पाटील यांनी शासकीय निवासस्थानावर अनधिकृत कब्जा केल्याची तक्रार असून त्यांच्या रहिवासाचे अतिक्रमण हटविणेबाबत व शासकीय निवासस्थान खाली करून घेणेबाबत 26 एप्रिल 2019 रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे जळगावचे मुख्य अभियंता, लघू पाटबंधारे विभाग, जळगांव कार्यकारी अभियंता, जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगांव अधिक्षक अभियंता, जलसंपदा विभाग शासनाचे अवर सचिव यांना तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे सुरेश पाटील यांनी लेखी तक्रार केली होती त्यामुळे आता व्ही.डी.पाटलांकडून शासकीय बंगला खाली होतो किंवा नाही याकडे लक्ष लागले आहे.
शासनाच्या फसवणुकीचाही आरोप
राज्य माहिती आयुक्त पद प्राप्त करतांना वसंत दत्तात्रय पाटील यांनी शासनाची, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेता यांची शुध्द दिशाभुल व फसवणूक केली असून पाटील यांनी राज्य माहिती आयुक्त पदासाठी जे लाभ घेतले आहेत ते वसुल करून पुढील कार्यवाहीची मागणी भ्र.वि.जन आंदोलन न्यासचे संघटक सुरेश जगन्नाथ पाटील यांनी केली आहे.