सरकारी रुग्णालय सुरू करण्यासाठी आमरण उपोषण

0

पनवेल । पनवेल शहरातील गोखले सभागृहासमोरील व ज्येष्ठ नागरिक सभागृहाच्या मागील बाजूस असलेल्या भूखंडावर उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. मात्र, प्रत्यक्षात निधी मिळालाच नाही असे कारण सार्वजनिक बांधकाम खाते देत असल्याने आजही हे काम रखडलेलेच आहे. त्यामुळे पनवेलच्या गोरगरीब नागरिकांना उपजिल्हा रुग्णालय सुरू होण्यासाठी अजून किती वाट पाहावी लागेल हेे सांगणे कठीणच. पनवेल परिसरात सध्या एकही सुसज्ज असे सरकारी रुग्णालय नाही, जे सरकारी रुग्णालय आहे ते सुविधा पुरवण्यात असमर्थ ठरत आहे. मुंबई-गोवा, सायन-पनवेल, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, जेएनपीटी-ठाणे हे महामार्ग पनवेलहून जातात कोकणातून मुंबईला येताना तसेच पुण्याहून मुंबईला जाताना मोठे अपघात घडल्यास एकही ट्रामा सेंटर नाही.

पनवेल येथे मोठे रुग्णालय असावे ही मागणी 2008 पासून करण्यात येत होती. आघाडीच काळात आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी हे असताना त्यांनीच या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आणि 30खाटांच्या रुग्णालयाला मान्यता मिळाली. मात्र, फक्त भूमिपूजन आणि नंतर 30 खाटांऐवजी पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला 120 खाटांच रुग्णालयाचा नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा लागला. मात्र, वेळोवेळी निधी कमी पडू लागला आणि उपजिल्हा रुग्णालयाचे काम थांबले. उपजिल्हा रुग्णालय सुरू होत नसल्याने व गोरगरिबांसाठी एकही चांगले रुग्णालय नसल्याने पनवेलच्या धनिक डॉक्टरांना याचा चांगला फायदा होत असून गोरगरीब मात्र आपले दागिने विकून, जमीन विकून पैसे आणून दवाखान्यात भरत आहेत. आपला आधार संघटनेतर्फे 6 सप्टेंबर रोजी सकाळी संस्थेचे उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरू आहे त्याठिकाणी आमरण उपोषण सुरू होणार आहे. उपोषण करताना काही बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी सा.बां. विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.