सरकार्यवाहपदी भैय्याजींना चौथ्यांदा मुदतवाढ

0

मार्च 2021 पर्यंत पदावर राहणार

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) भैय्याजी जोशी यांची चौथ्यांदा सरकार्यवाहपदी नियुक्ती केली आहे. हे पद सरसंघचालकांनंतर द्वितीय क्रमांकाचे मानले जाते. भैय्याजी हे 2009 पासून सातत्याने सरकार्यवाहपदावर कार्यरत असून, संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पदासाठी सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबोले किंवा कृष्ण गोपाल यांची नावे चर्चेत होती. परंतु, प्रतिनिधी सभेने भैय्याजींनाच मुदतवाढ दिली. ते आता मार्च 2021 पर्यंत या पदावर कायम राहतील. प्रतिनिधी सभेची बैठक 9 मार्चरोजी सुरु झाली असून, 11 मार्चपर्यंत चालणार आहे. दरम्यान, शनिवारी झालेल्या बैठकीत भारतीय भाषांचे संवर्धन व संरक्षण करण्यात यावे, असा ठरावही यावेळी पारित करण्यात आला. देशभरात सुरु झालेल्या पुतळा विटंबणेचा कालच संघाच्या या बैठकीत निषेध करण्यात आला होता.

भाषा संवर्धनाबाबत ठराव पारित
रा. स्व. संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनीच पुढील तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा, अशी अपेक्षा ठेवून होते. परंतु, भैय्याजींनी त्यास नकार दिला होता. परंतु, पुढीलवर्षी असलेल्या लोकसभा व काही राज्यांच्या निवडणुका पाहाता, जोशी यांनाच पुढील तीन वर्षासाठी या महत्वपूर्ण पदावर ठेवण्याचा निर्णय प्रतिनिधी सभेने घेतला आहे. तसेच, प्रतिनिधी सभेचे मत आहे, की भाषा कोणत्याही समाज तथा व्यक्तीची महत्वपूर्ण ओळख असते. ती त्या संस्कृतीचा वारसा पुढे नेत असते. तेव्हा भारतीय भाषांचे संवर्धन व संरक्षण झालेच पाहिजेत. त्यासाठी ठरावदेखील शनिवारी पारित करण्यात आला. अनेक भाषा लुप्त होत असल्याबद्दल यावेळी चिंताही व्यक्त करण्यात आली.