मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन केल्याने तीन भिन्न विचाराचे हे सरकार आहे. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे बोलले जात आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी देखील हे सरकार पाहुणे सरकार असून जास्त काळ टिकणार नाही असे भाष्य केले आहे. पत्रकार परिषदेत राणे यांनी शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीवर आरोप केले.
राज्यातील सुरु असलेले प्रकल्प, विकास कामे बंद करण्याचा सपाटा या सरकारने लगावला असल्याने हे सरकार स्थगित सरकार असल्याचा टोलाही राणे यांनी लगावला. राज्याला अधोगतीकडे नेणारे हे सरकार आहे. कोकणातील अनेक विकास कामे ठप्प झाली असून त्याला हे सरकार जबाबदार असल्याचेही आरोप राणे यांनी केले.
येणाऱ्या १५ ते १८ डिसेंबर दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यात गाव भेटी देणार असून हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारे सरकार असल्याचे जनतेला दाखवून देणार आहोत.