मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. नुकताच वर्षपूर्ती सोहळा देखील पार पडला. मात्र वर्षभरात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात नेहमीच धुसफूस दिसून आली आहे. पुन्हा महाविकासमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. आघाडीतील नेते एकमेकांवर टीका करू लागली आहे, यात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर देखील टीका करतात, ही गोष्ट कॉंग्रेसच्या महिला व बालकल्याण मंत्री तसेच कॉंग्रेस कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल तर कॉंग्रेसच्या शीर्ष नेतृत्त्वावर टीका करणे टाळा असा इशारा दिला आहे.
“आघाडीमधील नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आल्या आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन करावं”, असं ट्विट करत यशोमती ठाकूर यांनी सूचक इशारा दिला आहे.
“काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे. निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे”, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीबाबत काय वाटतं? असे विचारले असता अनेक मुद्द्यांवर भाष्य केले होते. यात त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबाबतही विधान केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव दिसतो, असे शरद पवार म्हणाले होते.