सरकार मंत्र्यांची मालमत्ता लपवत असल्याचा ठपका

0

मुंबई । मंत्र्यांची मालमत्ता आणि देणी सरकारने जाहीर करावीत अशी मागणी होत असतानाही भाजप सरकार याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांसह 21 कॅबिनेट आणि 13 राज्यमंत्र्यांची माहिती सरकार दरबारी सादर झाल्याची यादी गलगली यांना देण्यात आली आहे.काँग्रेस सरकारच्या कार्यकाळापासून आता भाजपा सरकारच्या कार्यकाळापर्यंत सतत मंत्र्यांची मालमत्ता व देणी याची माहिती सार्वजनिक करण्यासाठी अनिल गलगली पाठपुरावा करत आहे.

नोव्हेंबर, 2014 पासून पाठपुरावा
अनिल गलगलींना उपलब्ध करुन दिलेल्या माहितीत सामान्य प्रशासन विभागाने 21 कॅबिनेट आणि 13 राज्यमंत्र्यांची यादी दिली आहे. पण त्यात अनेक मंत्र्यांची नावे नाहीत. 23 कॅबिनेट मंत्र्यांपैकी एकनाथ शिंदे, डॉ. दीपक सावंत यांचे नाव यादीत नाही तर 16 राज्यमंत्र्यांपैकी संजय राठोड, दादाजी भुसे आणि रविंद्र वायकर यांचेही नाव यादीत नाही. अनिल गलगली यांच्या मते, ज्या मंत्र्यांनी आपली मालमत्ता व देणी सादर केले होते. त्यांची नावे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वेबसाईटवर प्रसिध्द केली होती. पण नवीन सरकारने माहिती सार्वजनिक करणे तर दूर उलट नावेही प्रसिध्द करण्याचे हेतुपूर्वक टाळले आहे. पंतप्रधान मोदी सर्व मंत्र्यांची मालमत्ता व देणी याची माहिती सार्वजनिक करतात. पण त्यांचे अनुकरण महाराष्ट्रात होताना दिसत नाही. 14 नोव्हेंबर 2014 पासून अनिल गलगली यांच्या मागणीचा विचार करणे तर सोडाच साधे उत्तर ही देण्याचे सौजन्य प्रशासनाने दाखविले नाही.