सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत चालढकल करते आहे-अजित पवार

0

मुंबई- महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर चालढकल करत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. त्यांची आज अजित पवारांनी भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवारांनी हे विधान केले.

भाजपा-सेना सरकारने फक्त मराठा आरक्षणाची घोषणा केली, प्रत्यक्ष कृती काही केली नाही. गेल्या चार वर्षांपासून हे सरकार आंदोलनकर्त्यांशी खेळ करते आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरु आहे. मात्र या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. आज हा मुद्दा आम्ही हिवाळी अधिवेशनात उचलून धरणार आहोत असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.

निवडणुका जवळ आल्याने भाजपाला राम, रामाचे मंदिर यांची आठवण आली आहे. चार वर्षात या सरकारला राम आठवला नाही, रामाला यांनी वनवासात पाठवले. जनतेने या सरकारचा खरा चेहेरा ओळखला पाहिजे असेही आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले.

मुख्यमंत्र्यांवरही अजित पवारांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री, इतर मंत्री मुंबईत असतात ते मराठा बांधवांशी चर्चा करू शकले असते. मात्र त्यांनी कोणताही पुढाकार घेतला नाही. मराठा बांधवांनी काळी दिवाळी साजरी केली तरीही सरकारला त्याचा काही फरक पडलेला नाही. ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे असेही अजित पवारांनी म्हटले आहे.