मुंबई । चंद्रकांत पाटील यांच्या ’बोगस’ वक्तव्याचा राष्ट्रवादीने केला निषेध कर्जमाफीसाठी अर्ज भरणार्या शेतकर्यांना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील बोगस म्हणतात. त्यांच्या वक्तव्यावरून सरकारला शेतकर्यांप्रती संवेदना नसल्याचे दिसून येते, शेतकर्यांना कर्जमाफी देण्यास दिरंगाई करण्यासाठीच सरकारने ऑनलाइन प्रक्रिया आणली. कर्जमाफीसाठी आतापर्यंत किती शेतकरी पात्र ठरले? हे सरकारने जाहीर करावे. अन्यथा 1 ऑक्टोबरपासून आंदोलन छेडणार, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिला.
15 ऑक्टोबरला डॉक्टरांची बैठक
पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यासह आपण सप्टेंबर महिन्याच्या 28 तारखेला सोलापूर आणि ऑक्टोबरच्या 13 व 14 तारखेला नागपूरचा दौरा करणार आहोत, असे तटकरे यांनी जाहीर केले. 7 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्य कार्यकारणीची बैठक होईल तसेच 8 ऑक्टोबर वकिल व महिल संघटनांची बैठक होईल.
मुंबईत सर्वात महागडे पेट्रोल
राज्यातील लोड शेडिंगच्या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले की, आम्ही 2014 साली सत्ता सोडली तेव्हा वीज उत्पादन आणि वीज मागणी यातील तफावत भरून काढली होती. आताच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात विजेची टंचाई भासत आहे. देशभरात वाढलेल्या महागाईवरूनही तटकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑईलचे दर कमी झाले असताना देशभरात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत देशातील सर्वात महागडे पेट्रोल विकले जात आहे. हेच का अच्छे दिन, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.