ठाणे : कर्ज बाजारी शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार कर्जमाफी देण्यास तयार नसल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या १० कार्यकर्त्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात मुंडन करीत सरकारचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजविल्याप्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधातही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन देत राज्यात सेना-भाजपचे सरकार निवडून आले आहे. मात्र निवडून आल्यावर हे सरकार कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी डोक्याचे केस काढून सरकारच्या विरोधात मुंडन आंदोलन केले. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष अभिजीत पवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी रायगडावर ढोल वाजवण्यात आले. ही शिवप्रेमींनी क्लेश देणारी गोष्ट असून या घटनेला जबाबदार धरत विनोद तावडे यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचाही निषेध करण्यात आला.
हे सरकार गंभीर नाही
राज्यात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मात्र, हे सरकार अद्यापही गंभीर नाही. आज शेतकऱ्यांच्या वेदना शहरी तरुणांना समजायला लागल्या आहेत. शहरी कार्यकर्त्यांचे मूळ हे ग्रामीण भागातील आहे. मात्र, या सरकारला त्या समजत नाहीत, अशी टीका आ. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात आहे. मद्रास न्यायालयानेही कर्जमाफीचे आदेश दिले आहेत. मात्र, महाराष्ट्रात हे शक्य होत नाही, यावरुन हे सरकार किती कुचकामी आहे, हेच सिद्ध होत आहे. या राज्याचा गाडा ज्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर चालत आहे. त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना हे सरकार गप्प आहे ही खेदाची बाब असल्याचे ते म्हणाले.