नागपूर-जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, मुक्ताईनगर, चोपडा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरकारकडे केली असतांना सरकारने फक्त 18 हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई देण्याची घोषणा सरकारने केली आहे. सरकार केळी उत्पादक शेतकऱ्यांची टिंगल, थट्टा करत असल्याचे आरोप माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी विधान सभेत केले. त्यामुळे खडसे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला घरचा आहेर दिला आहे.
मध्यप्रदेश सरकारकडून मदत
मुक्ताईनगर, रावेर, यावल तालुक्याला लागून मध्यप्रदेश राज्य असल्याने या तालुक्यातील अनेक शेती मध्यप्रदेश सीमेला लागून आहे. मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या शेतीतील केळीची नुकसान भरपाई म्हणून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी प्रती हेक्टर १ लाख रुपये नुकसान भरपाई देत, कर्जावरील व्याज माफ केले, वीजबिल माफ केली. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना का मदत करत नाही असा प्रश्न उपस्थित करत सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचे आरोप आमदार खडसे यांनी केले.
मतदार संघात कोणत्या तोंडाने जायचे-हरिभाऊ जावळे
आमदार हरिभाऊ जावळे यांनी यावल, रावेर, मुक्ताईनगर, चोपडा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना १ लाख रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विधानसभेत केली. अधिवेशनात केळी उत्पादक भरघोस असे काही मिळेल अशी अपेक्षा आहे. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सरकारकडे वारंवार नुकसान भरपाईची मागणी करत आहोत मात्र योग्यती नुकसान भरपाई दिली जात नसल्याने आता अधिवेशन संपल्यानंतर आम्ही आता कोणत्या तोंडाने आमच्या मतदार संघात जायचे असा प्रश्न आमदार हरिभाऊ जावळे यांनी उपस्थित करत सरकारवर नाराजी व्यक्त केली.
पालकमंत्री यांच्यासोबत बैठक
चोपडा तालुक्यातील एका शेतकऱ्याची बैलजोडी शेतात काम करतांना विजेच्या धक्क्याने दगावली या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार जावळे यांनी केली असता सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी लवकरात लवकर शेतकऱ्याला बैलजोडीची नुकसान भरपाई दिले जाईल असे आश्वासन दिले. तसेच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत एक बैठक घेऊन चर्चा करू असे कांबळे यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना आजच मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.