शिवसेनेकडून जनादेशाचा अनादर; कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्यास शुभेच्छा
मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अधिकच वाढला आहे. राज्यपालांनी भाजपला मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. मात्र बहुमत नसल्याने भाजपकडून सत्ता स्थापनेला विलंब होत आहे. दरम्यान आज दिवसभर भाजप नेत्यांची बैठक सुरु होती. दीर्घ खलबत झाल्यानंतर भाजप नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहे. फडणवीस यांच्यासोबत चंद्रकांत, पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, विनोद तावडे, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. राज्यपालांची भेट घेऊन झाल्यानंतर भाजप नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जनतेने महायुतीला कौल दिल्याने राज्यपाल यांनी मोठा पक्ष म्हणून भाजला आमंत्रित केले. त्यानंतर आम्ही राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांना आम्ही सरकार स्थापन करणार नसल्याचे सांगितले आहे. शिवसनेने महायुतीत निवडणूक लढवून सरकार स्थापन करण्यास नकार दिल्याने आम्ही सरकार बनविण्यात अपयशी ठरलो. शिवसेनेने जनादेशाचे अनादर केले असून कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्यास शुभेच्छा देत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.