सरते वर्षही ठरले राजकीय उलथा-पालथींचे

0

राजकीय मागोवा 2018

भुसावळ (गणेश वाघ)- राज्यातील कोअर कमेटीत दुसर्‍या स्थानी असलेल्या माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंना गेल्या दोन वर्षानंतरही न मिळालेला न्याय व पक्षाकडूनच त्यांना अडगळीत टाकण्याची झालेली खेळी तर शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीशी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी केलेला घरोबा व पालिकेच्या सभेत मुख्याधिकार्‍यांना जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी केलेल्या धक्काबुक्कीनंतर त्यांच्या झालेल्या निलंबनाने ‘सरते वर्ष 2018’ चर्चेत राहिले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील सख्य संबंध राज्याला ठावूक असतानाच वरणगावात मंत्री महाजन गटाच्या नगरसेवकावची नगराध्यक्ष पदावर लागलेली वर्णी व माजी मंत्री खडसेंना पराभवाचा धक्का बसल्याने राजकीय कुरघोड्यांनी वरणगाव पालिकेतील राजकारण लक्षवेधी ठरले.

भाजपाकडूनच माजी मंत्री खडसे अडगळीत
पक्ष वाढवण्यासाठी लढलेले-झटलेले व वेळप्रसंगी लाठ्या-काठ्या खावून तुरुंगाची हवा खालेल्ल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना त्यांच्याच भाजपा पक्षाने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींच्या रांगेत बसवून अडगळीत टाकले आहे. गेल्या दोन वर्षांपासून खडसेंच्या अडचणी कमी होण्यास तयार नाहीत वा पक्षाला त्यांचे पुर्नवसन करावेसे वाटलेले नाही. दाऊदच्या पत्नीशी संभाषण, पीएचे 30 कोटींचे लाच प्रकरण, जावयाची लिमोझीन कार, बेकायदा संपत्ती, भोसरी प्रकरण यासह एक ना अनेक प्रकरणांचे आरोप खडसेंवर झाल्यानंतर त्यांना मंत्री पदापासून पायउतार व्हावे लागले त्यानंतर चौकशी झाल्या, अहवालदेखील बाहेर आले, सर्व शुक्लकाष्टातून खडसे बाहेर आलेतरी पक्षाने मात्र त्यांना क्लीनचीट न दिल्याचे शल्य एकनाथराव खडसेंना आजही आहे. फेब्रुवारी महिन्यात खडसेंनी पाडळसे येथे तब्ब्ल 33 वर्षानंतर लेवा समाजाचे अधिवेशन घेवून समाज आपल्यामागे असल्याची ताकद दाखवून दिली. शंकरासारखे निर्माण करण्याची ताकद असेल तर भस्मसातही करू शकतो, असे विधान करून अप्रत्यक्षपणे आपल्या विरोधकांना गर्भीत इशारा दिला.

माजी मंत्री खडसेंना बाजूला सारत मंत्री महाजनांना पक्षाकडून बळ
सरत्या वर्षात अनेक सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी स्वपक्षावरच शेलक्या शब्दात टिका करून जाब विचारला मात्र पक्षश्रेष्ठींनी त्याची दखल घेतली नाही. मंत्री पदाची आशा नाही मात्र चुकलो कुठे हे सांगा, असे सांगत खडसेंनी जनतेच्या दरबारातच जावून आता न्याय मागण्याची वेळ आल्याचे सांगून राज्यात खळबळ उडवून दिली मात्र पक्ष नेतृत्वाने त्यांना शांत राहण्याचा सल्ला देत वेळ मारून नेली मात्र तरीही खडसे अडगळीतच राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकसोबतच धुळे व जळगाव महापालिकेची जवाबदारी सोपवण्यात आली व ‘महाजन पॅटर्न’ यशस्वी होवून भाजपाची सत्ता आली मात्र या निवडणुकीत खडसेंना कुठलीही जवाबदारी देण्यात आली नाही, ना सभांना बोलावण्यात आले तर साधा बॅनरवर खडसे ज्येष्ठ नेते असतानाही त्यांचा फोटो लावण्याचे धारीष्ट्य पक्षाने न दाखवल्याने खडसे पक्षापासून आणखीनच दुरावले. आज ना उद्या पक्षाचा विस्तार होवून खडसेंना संधी मिळेल, अशा वावड्याही वेळोवेळी उठल्या मात्र ना विस्तार झाला ना खडसेंना संधी मिळाली व आताची राजकीय स्थिती पाहता ‘ती’ मिळेलच याचीही शाश्‍वती नाही.

पक्षाच्या ज्येष्ठांचे अप्रत्यक्षपणे टोचले कान
खडसे हारणार्‍या व खचणार्‍या नेत्यांपैकी नक्कीच नाहीत. तीन राज्यातील झालेल्या पराभवाची त्यांनी मार्मिक प्रतिक्रिया देत पक्षापासून दुखावलेल्यांना जवळ घ्यावे लागेल, त्यांच्यात विश्‍वास निर्माण करावा लागेल, असे मार्मिक सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षश्रेष्ठींचे कान टोचले अन्यथा भाजपाचा पराभव अटळ आहे हेदेखील त्यांच्यात बोलवण्यातून जनतेलाही जाणवले. शिवसेना प्रमुख उद्धव टाकरे यांनी मंत्री महाजनांचा आरतीबाज नेते असा उल्लेख करून कधी काळी पॉवरबाज असलेले खडसे वाती वळत असल्याची टिकाही केल्यानंतर खडसेंनी ती टिका मार्मिकपणे स्वीकारत कदाचित आपण आरतीबाज नसल्याची टिका करून महाजनांवरही अस्त्र सोडले. पक्ष सोडण्याची आपली अजिबात इच्छा नाही मात्र पक्ष आपल्याला दूर लोटत आहे या त्यांच्या बोलण्यातून त्यांनी पक्षाला अल्टीमेटम तर दिला तर हाच धागा पकडत काँग्रेसच्या नेत्यांनी खडसेंच्या पक्षात आगमन झाल्यास स्वागतच असल्याचे सांगून भाजपाच्या अडचणी वाढवल्या. मध्यंतरी अजित पवारांनी निवडणुकीच्या तोंडावर अनेक भाजपा पदाधिकारी पक्षात प्रवेश करतील, असे विधान केल्याने खळबळ उडाली होती तर खडसेंनी देखील अनेक कार्यक्रमात आपण विरोधी पक्षनेते असताना सत्ताधार्‍यांची ‘पाचावर धार’ बसत असल्याचा दाखला देत आताचा विरोधी पक्ष चांगला असल्याची बोचरी टिका करून पक्षाला अडचणीत आणले होते. सतत 40 वर्ष पक्षासाठी झिजलेले खडसे छातीठोकपणे एक रुपयाचाही अपहार केला नसल्याचे दोन वर्षांपूसन ओरडून सांगत आहे मात्र भाजपा श्रेष्ठींनी खडसेंनी जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याचे दिसून येते. तीन राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपाला बसलेला फटका पाहता आगामी निवडणुकीच्या तोंडावर खडसे काय निर्णय घेतात? हे देखील आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दीपनगरातील लेवा समाजाच्या कार्यक्रमात खडसेंनी या अनुषंगाने केलेल्या ‘अन्याय झाला तर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी त्याचा प्रतिकार करायला हवा, आपण संख्येने कमी नाही’ या सूचक वक्तव्याचे देखील अनेक अर्थ काढले जात आहेत.

संतोष चौधरींच्या घरवापसीने राष्ट्रवादीला बळ
भुसावळ तालुक्याच्या राजकीय वातावरणात नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या माजी आमदार संतोष चौधरींनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत पुन्हा राष्ट्रवादीत पक्षाचे सुप्रीमो शरद पवार यांच्या उपस्थितीत 6 ऑक्टोबर रोजी प्रवेश करीत घरवापसी केल्याने भुसावळ तालुक्यात खर्‍या अर्थाने राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे. माजी मंत्री खडसे, आमदार संजय सावकारे यांना एकाकी झुंज देत चौधरींनी पालिका निवडणुकीत कुठलाही पक्ष नसताना केवळ जनआधारच्या बळावर तब्बल 21 जागांवर यश मिळवून देत आपली ताकद दाखवली होती. मध्यंतरी चौधरींच्या राजकीय हालचाली शांत होत्या मात्र भुसावळातील अतिक्रमणाच्या विषयात उडी घेत ते पुन्हा सक्रिय झाले. रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे व विद्यमान आमदार संजय सावकारे यांचे पक्षाकडून तिकीट कापले जाणार असल्याचा आरोप करून त्यांनी खळबळ उडवून दिली व भाजपा पक्षाकडूनही पर्यायी उमेदवारांची चाचपणी झाल्याचा दावा करून आगामी लोकसभा निवडणुकीत आपणच राष्ट्रवादी पक्षाचे दावेदार असल्याचा षड्डूही ठोकला. रावेर लोकसभेच्या जागेबाबत वाद असलेतरी राजकीय गोटात चौधरींनी चिंता निर्माण केली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! पक्षश्रेष्ठी जागा कुणालाही देवोत मात्र चौधरींच्या राजकीय अस्तित्वाला नाकारून चालणार नाही हे देखील तितकेच खरे !

जनआधारच्या चौघा नगरसेवकांना अपात्रतेचा झटका
भुसावळ पालिकेची सभा अन् दांगडो हा प्रघात हल्ली रूढ झाला आहे त्यामुळे सभेला नगरसेवक कमी अन् पोलिस बंदोबस्त जास्त, असेदेखील चित्र निर्माण झाले आहे. पालिकेच्या सभेत केलेला दांगडो व तत्कालीन मुख्याधिकार्‍यांना केलेल्या धक्काबुक्कीनंतर जनआधारचे गटनेते उल्हास पगारे, संतोष (दाढी), चौधरी, पुष्पा सोनवणे व रवी सपकाळे हे अपात्र ठरले असून पुढील पाच वर्ष त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी लादण्यात आल्याने माजी आमदार चौधरींना हादेखील मोठा झटका सरत्या वर्षात बसला. नगरसेवकांनी न्यायासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असलेतरी पालिकेतील जनआधारची ताकद क्षीण झाली आहे, हे म्हणणे धाडसाचे ठरेल.

वरणगावात आजी-माजी मंत्र्यांच्या नगरसेवकांमध्ये शीतयुद्ध
कधी काळी नाथाभाऊंचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेल्या सुनील काळेंना नगराध्यक्ष पदावरून डावलण्यात आल्याने त्यांनी वेगळी चुल मांडत जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांना आपले नेते केले व राष्ट्रवादीचा टेकू घेत पालिकेत सत्तेचा मुकूटही मिळवला मात्र वर्षभरानंतरही दोन्ही नेत्यांच्या गटातील नगरसेवकांमध्ये या ना कारणातून शीतयुद्ध सुरूच आहे. गटनेत्याचा वाद असो की पालिकेतील विविध विकासकामांचा विषय हे प्रकरण आता न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर शहराच्या विकासाला मात्र यात खीळ बसू नये, अशीदेखील जनतेची अपेक्षा आहे.