सरत्या वर्षात चर्चेत राहिली बॅडमिंटनपटू सिंधू

0

नवी दिल्ली : रिओत ऐतिहासिक रजतपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सरत्या वर्षांत गोल्डन गर्ल ठरली आहे. सिंधूने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सोनेरी यशाला गवसणी घातली. ऑलिम्पिक पदकामुळे तिला सत्रात देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तिने यावर्षीच चीन ओपनच्या रूपाने करिअरमधील पहिल्या सुपर सिरीजचा किताब पटकावला. यामुळे २१ वर्षीय सिंधूने बॅडमिंटनच्या विश्वात आपली छाप पाडली आहे. याशिवाय तिने महिला एकेरीच्या टाॅप-१० मध्येही धडक मारली. ऑलिम्पिकमध्ये रौप्य विजयाची कामगिरी करणारी भारताची ती पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली. तिने सायनापेक्षाही सरस कामगिरी केली. सायनाने २०१२ लंडनमध्ये कांस्यपदक जिंकले होते. सिंधूने वर्ल्ड सुपर सिरीज फायनल्समध्येही सरस खेळी केली. यामध्ये तिने आपल्या प्रतिभेच्या जोरावर चांगली कामगिरी केली. त्यामुळे तिला स्पर्धेतील प्रतिभावंत खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

प्रशिक्षकांमध्ये सायना-सिंधूचा श्रेष्ठ्तावाद!
प्रकाश पादुकोन यांनी शनिवारी पी. व्ही. सिंधू नजीकच्या भविष्यात जगातील नंबर वन खेळाडू बनू शकते, असे मत व्यक्त केले आहे. तथापि, सायना नेहवालचे प्रशिक्षक विमल कुमार यांच्यानुसार या दोघीही आॅलिम्पिकपदक विजेत्या खेळाडू असून, त्या पुढील पाच ते ६ वर्षांपर्यंत जागतिक बॅडमिंटनमध्ये दबदबा ठेवू शकतात. सायनाने लंडन आॅलिम्पिक २0१२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते आणि आॅलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू बनली होती. सिंधूने यावर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले आणि ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. ज्युनिअर खेळाडूंसाठी आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्टच्या कार्यशाळेदरम्यान पादुकोन यांनी निश्चितच सिंधू नंबर वन रँकिंग मिळविण्यात सक्षम असल्याचे सांगितले. तथापि, विमल यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते म्हणाले, ‘मी याविषयी मत व्यक्त करू शकत नाही. सिंधू व सायनासाठी हे चांगले आव्हान आहे. पुढील पाच ते सहा वर्षांत या दोन्ही खेळाडू जागतिक बॅडमिंटनमध्ये दबदबा बनवण्याची अपेक्षा आहे.