सरदार सरोवर धरणामुळे चार राज्यांचा विकास : मोदी

0

पंतप्रधानांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण

दाभोई : जनतेच्या स्वप्नांसाठी जगणे हेच माझे ध्येय आहे, माझ्यासह अनेकांनी सरदार सरोवर धरणाचे स्वप्न पाहिले होते. मात्र ते पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागली. सरदार सरोवर प्रकल्पाच्या बांधकामात अनेक अडथळे आले. अपप्रचार करण्यात आला. जागतिक बँकेने कर्ज दिले नाही, पण गुजरातची मंदिरे त्यासाठी पुढे आली. गुजरातच्या संत-महंतांची यात खूप महत्त्वाची भूमिका आहे. आज सरदार वल्लभभाई पटेल यांचा आत्मा आपल्या देशाला आशीर्वाद देत असेल यात शंका नाही. या धरणामुळे गुजरातसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. रविवारी मोदी यांच्या हस्ते सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पटेल, आंबेडकर असते तर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून सरदार सरोवर धरण प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी करण्यात आले. यावेळी मोदी म्हणाले, पाण्याचा स्रोत पुरेशा प्रमाणात नसेल तर कोणत्याही ठिकाणच्या विकासाला खीळ बसते. इथे सीमेवरच्या जवानांनादेखील पाण्याची समस्या भेडसवायची. आम्ही नर्मदेचे पाणी सीमेपर्यंत जवानांसाठी आणले. भाषणाच्या सुरुवातीलाच मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीचे स्मरण केले. आज जर सरदार वल्लभभाई पटेल आणि बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर हे धरण 60-70 च्या दशकातच तयार झाले असते, असे मोदी म्हणाले. हे धरण इंजिनीअरिंगचा एक उत्कृष्ठ नमूना आहे, असेही ते म्हणाले.

त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी
सरदार सरोवर प्रकल्पामुळे देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांचे भवितव्य बदलणार असून जनतेला जे पाणी मिळणार आहे त्यामुळे कोट्यवधी मातांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी असणार आहेत. मुक्या जनावरांना पाणी मिळणार आहे त्यांचेही आशीर्वाद मिळतील. 67 व्या वाढदिवसाच्या दिवशी यापेक्षा आनंदाचा क्षण कोणता असणार? असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सरदार सरोवराची निर्मिती लोकसहभागाशिवाय शक्य झाली नसती असे म्हणत मोदी यांनी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या जनतेचे व दोन्ही मुख्यमंत्र्यांचेही नरेंद्र मोदींनी आभार मानले.

बँकांनी नकार दिल्याने मंदिरांनी पैसा दिला
आईसमान असलेल्या नर्मदा नदीला आणि त्यावर तयार होणार्‍या सरदार सरोवर धरणाला आजवर अनंत अडचणींचा सामना करावा लागला. जगातून या धरणाला विरोध झाला. वर्ल्ड बँकेने या धरणाला निधी देण्यास नकार दिला. असे असले तरीही आम्ही हे धरण पूर्ण करण्याचा निश्चय केला होता, जो आज पूर्णत्त्वास आला. या प्रकल्पासाठी जेव्हा बँकांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा मंदिरांनी पैसे उभे केले. ही बाब अभिमानाची आहे.
पंतप्रधान