मुंबई । भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी न्या. लोयाप्रकरणी निकाल दिला. त्यावर आक्षेप घेत विरोधकांंनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग सुरू करण्याची मागणी केली तसेच पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. असे करून देशाच्या न्यायपालिकेची बदनामी होत आहे. त्यामुळे सरन्यायाधीश मिश्रा यांच्या समर्थनार्थ आज मुंबई उच्च न्यायालयाबाहेर सह्यांची मोहीम राबवण्यात आली. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयातील 51 वकिलांच्या शिष्टमंडळाने प्रभारी मुख्य न्यायमूर्तींना निवेदन सादर केले.
न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणी याचिका दाखल करून राजकीय पक्ष आणि त्यांच्याशी प्रेरित असलेले लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे, या मागणीसह मुंबई उच्च न्यायालयातील काही वकिलांनी उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे-तहिलरमानी यांना मंगळवारी एक पत्र लिहिले तसेच या पत्राचे सुमोटो याचिकेत रूपांतर करावे, अशी मागणीही या पत्रातून केली. प्रशांत मग्गू यांच्या पुढाकाराने पाठवलेल्या या पत्रात उच्च न्यायालयासह इतर कोर्टातील एकूण 51 वकिलांनी स्वाक्षर्या केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य गेटवर सह्यांची मोहीम राबवण्यात आली. याबाबत जनजागृतीचा एक भाग म्हणून एका मोठ्या साइनबोर्डवर हायकोर्टाबाहेर सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यापर्यंत राजकीय पक्षांची मजल गेल्याने याची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. देशाची प्रतिमा मलिन करण्यात काही वकील संघटनाही यात सामील होत असताना, उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य नसल्याची बाब या पत्रात प्रामुख्याने नमूद करण्यात आली आहे. जस्टिस लोया यांच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाशी संबंधित न्यायमूर्ती आणि वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याबद्दल तीव्र नाराजीही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे आता न्यायपालिकेतही न्या. दीपक मिश्रा यांचे विरोधक आणि समर्थक अशीही फूट पडली आहे.