धुळे । अपहार प्रकरणात सरपंचपदावरुन हकालपट्टी झालेले प्रकाश पाटील हे खोट्या नाट्या तक्रार करुन गावाच्या विकासाला खोडा घालत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चिंचखेडा ता.धुळे गावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2001 मध्ये सरपंच असतांना प्रकाश बाबुलाल पाटील यांना अपहार प्रकरणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने सरपंच पदावरुन कमी केले होते. आताचे विद्यमान उपसरपंच चैत्राम हिरामण पाटील आणि बाजीराव हिरामण पाटील यांच्या तक्रारीवरुन त्यांची हकालपट्टी झाली होती.
खोट्या सह्या
त्यामुळे राजकीय द्वेषातून प्रकाश पाटील हे खोट्या नाट्या तक्रारी करतात. ग्रामस्थांच्या खोट्या सह्या करुन तक्रारी देत असतात. त्यामुळे विकास कामात अडसर निर्माण होत आहे. त्यांच्या खोट्या तक्रारीमुळे आणि चौकशीमुळे गावच्या विकासाची कामे थांबली आहेत. म्हणून निधी खर्च झाला नाही तर त्यास जिल्हा परिषदेचे संबंधीत खाते प्रमुख जबाबदार राहतील.सध्या चिंचखेड्यात प्रकाश पाटील यांच्या गटाचे पाच सदस्य आहेत.तर सरपंचांच्या गटाचे पाच सदस्य आहेत. सत्तेपासून दुर रहावे लागत असल्यानेच ते तक्रारी करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी चैत्राम पाटील, बाजीराव पाटील, रोहिनी सुनील सोनार, ललिता पाटील, रमेश काशिनाथ पाटील, सुनील सोनार यांनी केली आहे.