सरपंचपदासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच

0

बारामती । बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड सोमवारी होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असून 12 ग्रामपंचायत सदस्य अज्ञात स्थळी गेलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून ही ग्रामपंचायत जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादीच्या अशोक सस्ते, रविंद्र वाघमोडे यांच्यासह आणखी एका सदस्याने बंडखोरी केल्याने विरोधकांची सदस्य संख्या बारा झालेली आहे. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 17 असल्याने चित्र पालटण्याची शक्यता केली जात आहे.

या ग्रामपंचायतीत तावरे बंधूमध्ये वाद-विवाद झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समेट घडवून आणलेला होता. या समेटानंतर सदस्यांमध्ये पुन्हा संतापाची लाट तयार झाली. विशेषतः गावातील रस्त्यांच्या कामांच्या निकृष्ट दर्जावरून सदस्यांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. हा वाद उफाळला गेला असून तीन सदस्यांनी भाजपाच्या सदस्यांबरोबर हात मिळवणी केल्याने भाजपाची बहुमताकडे वाटचाल होत आहे.

माळेगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या हातून गेल्यास बारामती तालुक्यात राष्ट्रवादीला चांगलाच धक्का मिळेल, अशी तालुक्यात चर्चा सुरू आहे. सध्याची परिस्थिती पाहता सरपंचपदाची निवडणूक ही फारच अटीतटीची होणार आहे. यामुळे बारामती तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. अज्ञातस्थळी गेलेले सदस्य हे सोमवारी मतदानासाठीच हजार होणार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. यामुळे अजित पवार यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

एकाच ठेकेदाराला सर्व कामे
बारामती तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून माळेगावचा उल्लेख केला जातो. या ग्रामपंचायतीला आलेला 2 कोटींचा निधी सदस्यांना विचारात न घेता परस्पर ठेकेदारी देण्यात येत असून एका सदस्याच्या नातेवाईकाला व या सदस्यालाच सर्व कामे दिली जातात. माळेगाव साखर कारखान्याने 25 लाख व घरपट्टी म्हणून 9 लाख रूपये अदा केलेले असून मुख्य रस्त्यासाठी राज्य सरकारने दिड कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तसेच घरपट्टी वसुली करण्यातही हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप या सदस्यांनी केला आहे.