सासवड । आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या दुसर्या टप्प्यातील निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्ये निरगुडसर ही ग्रामपंचायत पुणे जिल्ह्यात लक्षवेधी ठरणार आहे. सरपंचपदासाठी नागरीकांच्या मागास प्रवर्ग (ओबीसी) महीला जागेसाठी धर्मराज ग्रामविकास परिवर्तन पॅनेलकडून उर्मिला संतोष वळसे पाटील विरुद्ध निरगुडेश्वर ग्रामविकास पॅनेलकडून उर्मिला संतोष वळसेपाटील असल्याने मोठी चुरस वाढली आहे.
आंबेगाव तालुक्यातून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसेपाटील यांची पकड असून निरगुडसर हे गाव त्यांचे आहे. तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील तेथील असल्याने या गावाच्या निवडणुका लक्षवेधी ठरत आहेत. या गावात कोलतावडे गावाचे पुनर्वसन झाले आहे. या वार्ड क्रमांक तीनमधून या भागातील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यांची स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी आहे.
निरगुडेश्वर पॅनेलवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करत आहे. 11 पैेकी 9 जागेवर लढत होत असून दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. यात धर्मराज परिवर्तन पॅनेलने 8 जागी आपले सदस्य पदासाठी उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. धर्मराज पॅनेलचे प्रमुख माजी उपसरपंच रविंद्र वळसेपाटील, माजी ग्रा. प. सदस्य बबनराव वळसे पाटील, कैलासराव वळसेपाटील, बाळासो मेंगडे तसेच विठ्ठल वळसेपाटील काम करत असून विकास विरुध्द भ्रष्टाचार असे मुद्दे प्रचारात आहेत. दोन्ही पॅनेलकडून विजयाचा दावा केला जात आहे. 26 डिसेंबरला होणार्या मतदानावर त्यांचे भविष्य ठरणार आहे.