सरपंचाच्या हत्येने निंभोरावासी आक्रमक

0

भुसावळ । तालुक्यातील निंभोरा बुद्रूक येथील सरपंच शालीक सोनू सोनवणे (वय 61) हे 15 रोजीपासून बेपत्ता असल्याबाबत तालुका पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. सोमवार 19 रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास फेकरी तोल नाक्यापुढील असलेल्या रेल्वे पुलाखाली सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला. सकाळी रेल्वे गँगमन यांना सोनवणे यांचा मृतदेह रेल्वे पुलाखाली आढळून आल्याने त्यांनी फेकरी व निंभोरा येथील नागरिकांना याची माहिती दिली. निंभोरा येथील नागरिक घटनास्थळी पोहचले असता हा मृतदेह शालीक सोनवणे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. सोनवणे यांचा चेहरा काळा पडला होता. त्यांच्या हत्येची वार्ता गावात पसरताच संतप्त महिलांसह नागरिकांनी दीपनगर समोरील नागपूर – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 7.30 वाजेपासून रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल साडेचार तास वरणगाव व भुसावळकडील दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प झाली होती. नाहाटा महाविद्यालय ते फुलगाव असे दोन्ही बाजूला 15 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अप्पर पोलीस अधिक्षकांनी केली चौकशी
घटनेची माहिती मिळताच जळगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगडे यांच्यासह परिवेक्षाधिन अधिकारी मनिष कलवानीया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांनी बंदोबस्त राखला. सांगडे यांनी आंदोलनकर्त्यांना समजूत घालून सोनवणे यांचे जेही मारेकरी असतील त्यांना ताबडतोब अटक करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. असे सांगितले असतानाही संतप्त महिला व नागरिकांनी आरोपीला आत्ताच अटक करावी व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना ताब्यात घ्यावे अशी आग्रह धरला. पोलीसांनी तात्काळ पॅनलप्रमुख रामचंद्र तायडे यांसह सर्व 16 ग्रामपंचायत सदस्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तालुका पोलीस स्थानकात अप्पर पोलीस अधिक्षक बच्चनसिंग यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत सदस्यांची चौकशी केली. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसिलदार मिनाक्षी राठोड, नायब तहसिलदार संजय तायडे, तलाठी एन.आर. ठाकूर, मंडळाधिकारी शशिकांत इंगळे यांनीही भेट देऊन ग्रामस्थांची समजूत काढली.

निंभोरा गावात तणावाचे वातावरण
शालीक सोनवणे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असून सरपंच झाल्यापासून त्यांनी गावातील रस्ते, गटारी, पथदिवे या नागरि सोयीसुविधा पुरेपूर देण्याचा प्रयत्न करीत असल्याने गावातील सर्वांचे ते चाहते होते. त्यांच्या अशा निर्घृण हत्येमुळे संपुर्ण गावात शोककळा पसरली होती. त्याचप्रमाणे सरगम गेट, दीपनगर, निंभोरा येथील व्यावसायिकांनी देखील स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती. सोनवणे यांच्या हत्येमुळे गावात तणावाचे वातावरण असून पोलीसांचीही तुकडी गावात तैनात करण्यात आली आहे.

प्रवाशांची गैरसोय
तब्बल साडेचार तास वाहतुक ठप्प असल्याने प्रवाशांची तसेच सकाळी शाळेत जाणार्‍या विद्यार्थी तसेच कामगारांची गैरसोय झाली. सकाळी 7.30 ते 11 वाजेपर्यंत वाहतुक ठप्प असल्याने बस तसेच स्कुलबस मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. पोलीसांनी मध्यस्थी करुन संतप्त ग्रामस्थांना समजूत घालून अखेर रस्तारोको आंदोलन मागे घेण्यास लावले.

वाहनांवर केली दगडफेक
सरपंच सोनवणे यांच्या हत्येचे वृत्त गावात कळताच संतप्त ग्रामस्थांनी हातील कामे सोडून धावपळ करीत घटनास्थळाकडे रवाना झाले. महामार्गालगत असलेल्या उड्डाण पुलाजवळ मयताचे नातेवाईक व ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे वाहनधारकांना याठिकाणाहून जाण्यास मार्गच नसल्याने त्यांनी दुसर्‍या ठिकाणाहून आपली वाहने काढण्याचा प्रयत्न केला असता याप्रसंगी संतापाच्या भरात काहींनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यात दोन दुचाकी वाहनांवर दगडफेक करण्यात आली. मात्र पोलीसांनी याठिकाणी लागलीच धाव घेतल्यामुळे दगडफेक करणारे तरुण पसार झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलीस कर्मचार्‍यांनी यावेळी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र काहींनी विरोध केला असता त्यांना काठीचे वार सहन करावे लागले.

महामार्गासह निंभोरा गावात पोलीस बंदोबस्त तैनात
संतप्त ग्रामस्थांनी सकाळी महामार्गावर काटेरी झाडाच्या फांद्या तोडून रस्ता अडविला. पोलीसांना घटनास्थळी येण्यास उशिर झाल्यामुळे वातावरण अधिकच चिघळत असल्याचे दिसून आले. मात्र परिवेक्षाधीन पोलीस अधिकारी मनिष कलवानिया यांनी घटनास्थळी पाहणी करुन वातावरणाची गंभीरता लक्षात घेता लागलीच अतिरीक्त कुमक मागवून घेतली. त्यामुळे महामार्ग तसेच निंभोरा गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मयत सोनवणे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

मृतदेहावर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन
दरम्यान उड्डाणपुलाजवळ काम करीत असलेल्या रेल्वे कर्मचार्‍यास काटेरी झुडपांच्या आड मृतदेह फेकल्याचे आढळून आले. या कर्मचार्‍याने फेकरी व निंभोरा येथील ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. मयत सोनवणे यांचा चेहरा तसेच हाताचा रंग काळा पडला असल्याचे दिसून आले. पोलीसांनी याठिकाणी येऊन मृतदेहाचा पंचनामा केला. तर जळगाव येथे शवविच्छेदनासाठी कॅमेराची व्यवस्था नसल्यामुळे इन – कॅमेरा शवविच्छेदनासाठी सरपंच सोनवणे यांचा मृतदेह धुळे येथे नेण्यात आला.