भुसावळ । साकेगाव ग्रामपंचायत व जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटना आयोजित सरपंच चषक – 3 चे सामने अत्यंत रंगतदार स्थितीत होत असून शेवटच्या खेळीपर्यंत सामने रंगत आहे. 10 संघ स्पर्धेतून बाद झाले असून 8 संघात उपउपांत्य फेरी सामन्याची भिडत होणार असून रविवारी दोन उपांत्य व स्पर्धेचा अंतीम सामना होणार आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
उपउपांत्य फेरीचे सामने
शनिवार 21 रोजी उपउपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये नवनाथ विरुध्द त्रिमुर्ती क्रिकेट क्लब, जय श्रीराम 2 विरुध्द योध्दा क्रिकेट टिम, ओम साई गृप विरुध्द जय बजरंग संघ, एसएससी क्रिकेट टिम विरुध्द जय महाराष्ट्र टिम असे होणार असून सर्व सामने तुल्यबळ संघात खेळले जाणार असून विजेते चार संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होतील.
विजेत्या संघास मिळणार 11 हजारांचे बक्षिस
साकेगाव सरपंच चषकाचा विजेता रविवारी ठरणार असून गावात क्रिकेटप्रेमी, आबालवृध्दांमध्ये विजेता संघ कोण ठरणार, याबाबत उत्सुकता लागून आहे. विजेत्या संघाला ग्रामपंचायततर्फे 11 हजार रुपयांचे रोख बक्षिस व फिरता चषक तसेच प्रतिष्ठित व्यक्तिंकडून रोख बक्षिस व चषक मिळणार आहे.
यांचे लाभते सहकार्य
या स्पर्धेमध्ये उपविजेत्या संंघास जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेकडून पाच हजार रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. विजेत्या संघाची गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाणार असून या संघाची प्रतिमा वर्षभरापर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात प्रदर्शित करण्यात येईल. सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कमिटी, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटना, आयोजन समिती व सर्व संघांचे खेळाडू तसेच क्रिकेटप्रेमींचे सहकार्य लाभत आहे.