भुसावळ । तालुक्यातील पिंप्रीसेकम निंभोर्याचे सरपंच शालीक सोनू सोनवणे (वय 61) यांचा सोमवार 19 रोजी फेकरी तोलनाक्यापुढे रेल्वे उड्डाणपुलाखाली कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथील वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आला होता. आज दुपारी 3 वाजता त्यांचा मृतदेह निंभोरा येथे आणण्यात आला. यावेळी गावात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी 4 वाजता दीपनगर येथील तापी नदी किनारी शोकाकुल वातावरणात त्यांचा सामाजिक पध्दतीने दफनविधी करण्यात आला. याप्रसंगी संपुर्ण गावासह दीपनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे 100 हून अधिक पोलीसांचा फौजफाटाही याप्रसंगी उपस्थित होता. सकाळी 10.30 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत परिवेक्षाधीन अधिकारी मनिष कलवनिया, उपनिरीक्षक राहूल पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. निलोत्पल यांनी घटनास्थळाजवळील संपुर्ण भागाची तपासणी केली. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना योग्य त्या सुचना दिल्या.
व्यावसायिकांनी पाळला बंद
निंभोरा, दीपनगर येथील किरकोळ विक्रेत्यांसह दुकानदारांनी गेल्या दोन दिवसांपासून आपापली दुकाने बंद ठेवली आहेत. गावात चार पोलीस पथके तैनात करण्यात आले असून यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पोलीसांची एक तुकडी तसेच मुख्य बाजारात एक तुकडी अशा दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
पाणी पुरवठा ठप्प
गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायतीचे कर्मचारी गावात पाणी पुरवठा करीत नसल्यामुळे दोन दिवसांपासून संपुर्ण गावाचा पाणी पुरवठा ठप्प पडला आहे. त्यामुळे रहिवाशांचे पाण्यासाठी भटकंती करावी लागली. ग्रामपंचायत कर्मचार्यांनी पाणी सोडावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाच संशयीत ताब्यात
सरपंच शालिक सोनवणे यांचा राजकारणातून घातपात केला असल्याचा आरोप त्यांचा मुलगा विनोद सोनवणे यांनी पोलीसांकडे केला आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी म्हणून पोलीसांनी लोकशाही पॅनलचे प्रमुख रामचंद्र तायडे, ग्रामपंचायत सदस्य योगीराज सोनवणे, ग्रामपंचायत शिपाई रवि सोनवणे, सदस्य रमेश गायकवाड यांसह 1 जण पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्याकडून पोलीस त्यांची चौकशी करीत आहे.