मुरबाड । तालुक्यातील महत्त्वाची मानल्या जाणार्या सरळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी-शिवसेना युतीच्या वनिता मधुकर घुडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे होणार्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेनेची युती होणार असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सरळगाव परिसरात राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सरळगाव ग्रामपंचायतीमध्ये एकूण 11 सदस्य आहेत. त्यामध्ये सरपंच नेताजी घुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त होती. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुभाष घरत, मुरबाड विधानसभा संघटक आपा घुडे, मुरबाड तालुका प्रमुख कांतीलाल कंटे, शहरप्रमुख राम दुधाळे, मुरबाड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष रामभाऊ दळवी, माजी सभापती सुभाष पवार तसेच शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक मताने पराभव
सरपंचपदाच्या या रिक्त जागेसाठी निवडणूक 3 नोव्हेंबर 2017 रोजी सरळगाव ग्रामपंचायत कार्यालयात झाली. त्यामध्ये 9 सदस्य हे राष्ट्रवादीचे व 1 भाजपा व 1 शिवसेनेचा आहे. ऐनवेळी राष्ट्रवादीचे 4 सदस्य भाजपात गेल्याने सरपंच पद मिळवण्यासाठी भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु शिवसेनेचा एकमेव सदस्य असलेल्या वनिता मधुकर घुडे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून वनिता घुडे याना सहा मते मिळाली. तर भाजपाचे उमेदवार चेतन घुडे यांचा 1 मतांनी पराभव होऊन सरळगाव सरपंचपदी राष्ट्रवादी शिवसेना-युतीच्या वनिता मधुकर घुडे यांची सरपंचपदाची वर्णी लागली आहे.