सरळसेवा आणि पदोन्नतीने नियुक्तीसाठी

0

मुंबई – राज्य शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेतील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासकीय गट अ व ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटपाच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

यामुळे राज्याच्या सर्व विभागातील तुलनेने अविकसित जिल्ह्यांमधील रिक्त पदांचा अनुशेष दूर होण्यास मदत होणार असून कोकण-१ या नव्या रचनेमुळे पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड या जिल्ह्यांमधील रिक्त पदे प्राधान्याने भरण्यात येणार आहेत. मंगळवारी याबाबतच्या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या सुधारणांनुसार विभाग वाटपासाठी कोकण महसुली विभागाचे कोकण-१ (पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड) आणि कोकण-२ (ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर) असे दोन महसुली विभाग करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी एकूण सात महसुली विभाग उपलब्ध असतील. तसेच महसुली विभाग वाटपाचा क्रम नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण-१, नाशिक, कोकण-२ आणि पुणे असा राहणार आहे. या सुधारित कार्यपद्धतीमुळे कोकण विभागातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड या जिल्ह्यातील पदे प्राधान्याने भरली जातील.

मानव विकास निर्देशांकानुसार प्रत्येक विभागातील जिल्ह्याची क्रमवारी निश्चित करण्यात आली असल्यामुळे अविकसित जिल्ह्यांमधील पदे भरण्यास प्राधान्य राहील. सरळसेवेने नियुक्ती करताना फक्त अनुसूचित क्षेत्रातील (केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या) पदे प्राथम्याने भरण्याची प्रशासकीय विभागास आवश्यकता असल्यास त्यानुसार प्रशासकीय विभागांना पदे भरण्याची मुभा देण्यात आली आहे. ही प्रक्रिया करण्यापूर्वी शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागांनी आपल्याकडील गट अ व गट ब मधील प्रत्येक संवर्गातील पदे महसूल विभागनिहाय निश्चित करणे आवश्यक आहे.

आजच्या निर्णयानुसार वाटपासाठी उपलब्ध पदांमधून नागपूर, अमरावती व औरंगाबाद विभागातील मंजूर पदांच्या 80 टक्के पदे भरण्यात येतील. त्यानंतर वाटपासाठी शिल्लक पदसंख्येच्या 80 टक्के पदे नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण 1 व नाशिक या पाच महसुली विभागांत व 20 टक्के पदे कोकण 2 व पुणे या दोन महसुली विभागांत रिक्त पदांच्या प्रमाणात भरण्यात येतील. यामुळे नागपूर, अमरावती व औरंगाबाद या विभागातील मंजूर पदांच्या किमान 80 टक्के पदे सतत भरलेली असतील.

महसुली विभाग वाटपातून वगळण्यात येणाऱ्या प्रकरणांच्या क्रमामध्ये बदल करण्यात आला असून ज्या अधिकाऱ्याचा जोडीदार किंवा त्याचे मूल मतिमंद आहे किंवा ज्या अधिकाऱ्यांनी मतिमंद असलेल्या स्वतःच्या भावाचे किंवा बहिणीचे पालकत्व स्वीकारलेले आहे अशी सुधारणा करण्यात आली आहे. पती-पत्नी एकत्रिकरणाबाबतीतही नवीन विभागानुसार बदल करण्यात आला आहे. त्यानुसार कोकण २ व पुणे महसुली विभागातून केवळ नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण १ व नाशिक हे महसुली विभागच बदलून देता येणार आहेत. कोकण विभागाचे कोकण १ व कोकण २ असे दोन विभाग तयार करण्यात आले असल्याने आपसात महसुली विभाग बदली या कारणास्तव महसुली विभाग बदल करताना पुणे व कोकण २ महसुली विभागातून नागपूर किंवा अमरावती किंवा औरंगाबाद किंवा नाशिक किंवा कोकण १ महसुली विभागात बदलून जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रथम अशा बदलून दिलेल्या महसुली विभागात रुजू होणे आवश्यक राहणार आहे.