आरोपींची धरपकड ; जुन्या वादातून एकाच्या घरावर हल्ला
नंदुरबार :- जुन्या भांडणाच्या वादातून एकाच्या घरावर संतप्त जमाव हल्ला करीत असताना विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक व कर्मचारी धावून गेल्यानंतर त्यांच्यावरच जमावाने हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी विसरवाडी येथे घडली. या प्रकरणी नंदुरबारहून अतिरीक्त कुमक मागवण्यात आली असून आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली आहे. जमावाच्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.
विसरवाडी येथील महेंद्र गिरधारीलाल जाट यांच्या घरावर नवापूर तालुक्यातील वागदी गावातील सुमारे शंभराहून अधिक जणांच्या जमावाने हल्ला चढवत त्यांच्या कुटुंबियांना मारहाण सुरू केली. घटनेची माहिती कळताच विसरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व कर्मचारी जमावाला आटोक्यात आणत असताना जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. जमावाने तुषार सोनवणे व भगवान गुट्टे यांना बेदम मारहाण केली तर सहायक पोलीस निरिक्षक धनंजय पाटील व इतर पाच कर्मचार्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करीत धक्काबुक्की केली.