मुझफ्फरपूर (वृत्तसंस्था) – भारतीय लष्कराला तयार होण्यासाठी सहा ते सात महिने लागू शकतात, परंतु संघाचे स्वयंसेवक केवळ तीन दिवसांत तयार होऊ शकतात, अशी आमची क्षमता आहे, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी केले होते. सोमवारी त्यांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी खरपूस समाचार घेतला. हा शहिदांचा आणि सैनिकांचा अपमान असून, असे वक्तव्य करणार्या भागवतांना लाज वाटायला हवी, अशी तोफ काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी डागली. तर भागवतांनी जवानांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावरदेखील सरसंघचालकांच्या वक्तव्याची जोरदार खिल्ली उडविली जात असल्याचे दिसून आले. रा. स्व. संघाने यासंदर्भात पत्र काढून, प्रसारमाध्यमांनी सरसंघचालकांच्या वक्तव्याचा विपर्यास्त केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
चीनचा प्रतिकार करण्यासाठी स्वयंसेवक सीमेवर होते!
सैनिकांना देशसेवेसाठी तयार करण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात. देशाला गरज पडली तर 3 दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसवेक सज्ज असतील, ही आमची क्षमता आहे. देशाच्या दुसर्या कोणत्याही संघटनेत ती नाही, असे सरसंघचालक म्हणाले होते. संघाचे स्वंयसेवक मातृभूमीच्या रक्षणासाठी कायम तयार असतात. ते हसत-हसत बलिदानही देऊ शकतात. कोणत्याही परिस्थितीसाठी ते तयार असतात. जेव्हा चीन हल्ला करण्याच्या तयारीत होता त्यावेळी सीमारेषेवर लष्कर येईपर्यंत स्वयंसेवक तिथे उभे होते. जर चीनी सैनिक आलेच तर प्रतिकार करण्याची त्यांची तयारी होती, असेही सरसंघचालकांनी सांगून, खळबळ उडवून दिली होती.
… तर भाजपने त्यांना पाकिस्तानात पाठवले असते
डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर आम आदमी पक्षानेही जोरदार टीका केली आहे. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ट्विट करुन त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘हेच वक्तव्य दुसर्या पक्षाच्या व्यक्तीने केले असते तर भाजपने त्यांना आतापर्यंत पाकिस्तानात पाठवले असते.‘हम आह भी भरते है तो हो जाते है बदनाम, वो कत्ल भी करते है तो चर्चा नही होती, अशा शब्दात आम आदमी पक्षाने भागवतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले, ’हा सैनिकांचा अपमान आहे. भागवतांनी भारतीय जवानांची माफी मागितली पाहिजे.’
सरसंघचालकांवर गुन्हा दाखल करा : हार्दिक पटेल
पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनीही ट्विटवरून भागवतांवर हल्लाबोल केला. संघप्रमुखांनी आता आमच्या लष्करावर शंका उपस्थित केली आहे. लष्कराला कमी लेखणारे मोहन भागवत यांच्याकडून राष्ट्रभक्ती कोणाला शिकायची आहे. लष्कराचा अपमान करणार्या भागवतांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे पटेल म्हणाले. काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी ट्विट करुन भागवतांच्या वक्तव्यावर टीका केली. ट्विटमध्ये म्हटले, आम्ही जेव्हा इंग्रजांशी लढत होतो तेव्हा तुमचे संघटन लपून बसले होते. सीमेवर जवान शहीद होत आहेत आणि तुम्ही त्यांचा अपमान करता. पंतप्रधान चुकीचे आहेत ते पुरेसे आहे.
संघ म्हणते, वक्तव्याचा विपर्यास केला!
भागवत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी स्पष्टीकरण दिले. ‘सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बिहार येथे दिलेले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसारीत करण्यात आले. भागवत यांनी म्हटले, की गरज भासल्यास आणि राज्यघटनेने मान्यता दिल्यास सर्वसामान्य लोकांना तयार करण्यासाठी आपल्या सेनेला सहा महिने लागणार, पण भारतीय सैनिक संघाच्या स्वयंसेवकांना तीन दिवसात तयार करू शकेल. कारण स्वयंसेवकांना शिस्तीचा सराव असतो. ही सेनेसोबत तुलना नाही, तर सामान्य जनता आणि स्वयंसेवकांमध्ये तुलना आहे, अशा प्रकारचे स्पष्टीकरण संघाकडून देण्यात आले आहे.