नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यासाठी तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भातील कागदत्रे आपल्याकडे असल्याचा खुलासा टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने केला आहे.
हिंदू दशहतवादाची थिअरी
हिंदू दहशतवादाच्या नावाखाली यूपीए सरकार संघप्रमुख मोहन भागवत यांचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यासाठी सत्तेच्या शेवटच्या काळात प्रयत्नशील होते. अजमेर आणि मालेगाव स्फोटानंतर यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाची थिअरी मांडली होती. यासाठी एनआयएसारख्या यंत्रणेवर दबाव टाकला जात होता. असे म्हटले जात आहे की, अजमेर आणि अन्य बॉम्बफोटांप्रकरणी मोहन भागवत यांना तपास अधिकारी ताब्यात घेणार होते. हे अधिकारी यूपीए सरकारमधील मंत्र्यांच्या इशार्यावर काम करत होते. ज्यामध्ये तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नावही घेतले जात आहे.
एनआयएवर दबाव
करंट अफेअर मासिकाच्या फेब्रुवारी 2014च्या अंकात बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी असिमानंद यांची मुलाखत प्रकाशित झाली होती. या मुलाखतीत भागवत यांच्या इशार्याने काही कामे केल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर यूपीए सरकारने एनआयएवर दबाव वाढविण्यास सुरूवात केली. परंतु, एनआयएप्रमुखांनी त्यास नकार दिला होता. त्यांना या मुलाखतीच्या ऑडिओ रेकॉर्डिंगची न्यायवैद्यक चाचणी करायची होती. परंतु, त्यामधूनही पुढे काहीच निष्पन्न न झाल्याने एनआयएने ती केस बंद केली.