सरसकट कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन

0

जळगाव । शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी व पिकाला हमीभाव यावरून राज्यशासनाने शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनाची सरकारने पूर्तता केली नसल्याचा आरोप करत राज्य सरकारने कर्जमाफीची योग्य अमंलबजावणी न झाल्यामुळे सोमवारी 14 ऑगस्ट रोजी बांभोरी नदीवरील पुलाजवळ दुपारी 2 ते 2.30 वाजेच्या दरम्यान चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आता सर्वपक्षिय आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहे. सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली; मात्र यामध्ये शेतकर्‍यांना लाभ होणार नाही, यासाठी सतत बदल करत सरकारने शेतकर्‍यांची थट्टा लावली आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन फॉर्म भरून घेताना शेतकर्‍यांचे हाल सुरू आहेत. केवळ कागदावर असलेल्या कर्जमाफीचा राज्यात गवगवाकरत असल्याचा आरोप सुकाणू समितीने आंदोलनात केले. दरम्यान आंदोलन करत असतांना सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे परभणीचे पालकमंत्री असल्यामुळे 15 ऑगस्ट रोजी ध्वाजारोहण करण्यासाठी उपस्थिती देण्यासाठी पाळधीहून परभणीकडे जात असतांना त्यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेवून हा शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसदर्भातील प्रश्‍न शासनदरबारी मांडणार असल्याचे आश्‍वासन दिले.

कर्जमाफी करण्याचा निर्णय तीन वेळा तर घोषणा चार वेळा
राज्यातील शेतकर्‍यांची दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय तीन वेळा घेतला आणि चारवेळेस घोषणा केली. कर्जमाफीसाठी दोन महिन्याचा अवधी मागीतला परंतु त्याचा अद्यापयर्र्ंत कोणताही फायदा एकाही शेतकर्‍याला मिळाला नाही. प्रत्येक शेतकर्‍याला प्रोत्साहन म्हणून जाहीर केलेले 10 हजार रूपये दिले नाही. जनता व मीडियांच्या समोर शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्‍वासन देवून वारंवार बदलले जाणारे निर्णय, जाचक अटी व निकष यामुळे सर्वसामान्य शेतकर्‍यांमध्ये कर्जमाफीबाबत संभ्रवास्था व साशंकता निर्माण झाली आहे. कर्जमाफीचे निकष पालकमंत्र्यांनी पाळले नाही, शेतकर्‍यांना हमी भाव नाही. त्यामुळे मंगळवार 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते न होण्यासाठी आम्ही विनंती करणार असल्याचेही यावेळी आंदोलन करतांना सुकाणू समीतीच्या वतीने करण्यात आले. सरकारने कर्जमाफीची योग्य अमंलबजावणी न झाल्यामुळे 14 ऑगस्ट रोजी शहरातील बांभोरी नदीजवळ दुपारी 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दीड तास वाहतूकीची खोळंबली
दुपारी 2 वाजेच्या सुमारास सर्वपक्षिय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बांभोर बसस्थानकासमोर एकत्र येवून चक्काजाम आंदोलनास सुरूवात झाली. आंदोलन सुरू होत असतांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूकीची पुर्णपणे कोंडी झाली होती. 40 मिनीटे आंदोलन झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको बंद केला. यावेळी आंदोलनामुळे वाहतूकीचा पुर्णपणे खोळंबा झाला होता. बांभोरी ते पाळधीपर्यंत आणि पुलापासून ते थेट दादावाडीपर्यंत वाहनांची रांग लागली होती. आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी रहदारी मोकळा करण्यासाठी मदत करत वाहतूकीची कोंडी कमी होत दीड तासानंतर या रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला. दरम्यानच्या काळात पाळधी पोलिस स्थानक व तालुका पोलिस स्थानकातील पोलिस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.

यांची होती उपस्थिती
संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संजीव सोनवणे, सुकाणू समिती संघटक एस.बी पाटील, भारत कृषक समाज सदस्य जगतराव पाटील, जेडीसीसी संचालक संजय पवार, कॉग्रेस माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, डी.जी.पाटील, विनोद देशमुख, डी.डी.बच्छाव यांच्यासह शेतकरी बांधव शेतकरी संघटनेचे राष्ट्रवादी कॉग्रसे व काँग्रसचे पदाधिकारी यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.

सत्ताधार्‍यांमध्ये सत्तेची मस्ती दिसून येते – संजीव सोनवणे
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संजीव सोनवणे यांनी आंदोलनात सांगितले की, जिल्ह्यात तालुक्यातील ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आज राज्यासह देशात शेतकर्‍यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे, शेतकर्‍यांला हमी भाव नाही, शेतकर्‍याला बँकेचे कर्ज मिळत नाही. कर्जमाफी मिळत नाही, तसेच बळीराजाने पिकवलेल्या शेतमालाला हमी भाव पाडण्याचे षडयंत्र सत्ताधारी सरकार करीत आहे. आत्तापर्यंत या कारणांमुळे राज्यात आत्तापर्यंत हजारो शेतकर्‍यांना आत्महत्या केलेल्या आहेत. या सरकारला जागे करण्यासाठी, या सरकारला जाब विचारण्यासाठी आता हा शेतकरी बांधव रस्त्यावर उतरला आहे, शेतकरीबांधवांसाठी सुकाणू समितीसह राज्यातील सर्व शेतकरी संघटना यांनी एकत्र आले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातूनही सुकाणू समितीचे एस.बी.पाटील हे गेल्या तीन वर्षांपासून शेतकर्‍यांसाठी लढा देत आहे. मात्र सुकाणू समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पाहिला टप्पा म्हणून राज्यात चक्काजाम आंदोलनापासून सुरूवात केली आहे. शेतकर्‍यांच्या या मागणींकडे शासनावर बसलेले सत्ताधारी मस्तीमध्ये असल्याचे दिसून येते, त्यांना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे कोणतीही चिंता नाही.

योग्य निर्णय न घेतल्यामुळे सुकाणू समिती रस्त्यावर -डी.जी.पाटील, कॉग्रेस
शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी न मिळावी यासाठी सत्ताधार्‍यांकडून सुकाणू समितीत फुट पाडण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीची घोषणा करून तोंडाला पाने पुसण्यासारखे सरकारने केले आहे. त्यामुळे सुकाणू समितीला पुन्हा रस्त्यावर यावे लागले आहे, अजून कोणत्याही शेतकर्‍यांचे समाधान फडणवीस सरकार करू शकले नाही, विविध प्रकारचे जाचक अटी लावून कर्जमाफी देण्याची निर्णय घेतला मात्र यामुळे कोणत्याही शेतकर्‍यांला कर्जमाफी मिळाली नाही, मात्र सुकाणू समितीची एकच मागणी आहे, शेतकर्‍यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे, संपुर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. देशात इतर राज्यात कर्जमाफीचा निर्णय घेण्यास काही वेळ लागला नाही मात्र महाराष्ट्राच हा निर्णय घेण्याचा एवढा विचार करावा लागतो. आत्ताचे सरकार शेतकर्‍यांच्या जिवाशी खेळणारे सरकार असल्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असे काँग्रेसचे डी.जी.पाटील यांनी केले.

कायदा हातात घेवून कायदा शिकविणार – एस.बी.पाटील
जनता व मीडियांच्या समोर शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्‍वासन देवून वारंवार बदलले जाणारे निर्णय, जाचक अटी व निकष यामुळे सर्वसामान्य शेतकर्‍यांमध्ये कर्जमाफीबाबत संभ्रवास्था व साशंकता निर्माण झाली आहे. कर्जमाफीचे निकष पालकमंत्र्यांनी पाळले नाही, शेतकर्‍यांना हमी भाव नाही. बॅकेचे अधिकारी, शासकिय अधिकारी, जिल्हा बॅक, एसएलपीसी असेल त्यांनी कर्जमाफीसाठी अद्याप ठराव केले नाही आणि त्यामुळे सुद्धा कर्जमाफीचा फायदा मिळत नाही, विशेष म्हणजे सुप्रिम कोर्टाचे आदेश पाळत नाही. त्यामुळे त्यांसाठीही आंदोलन करावं लागणार आहे, त्यासाठी ऑक्टोबरनंतर कायदा शिकविण्यासाठी कायदा हातात घेवून बेकायदेशीर काम करावे लागणार आहे, असल्याचे सुकाणू समिती संघटक एस.बी पाटील यांनी सांगितले.