सराईत आरोपीला वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक

0
वाकड पोलिसांनी केला 3 लाखांचा ऐवज जप्त 
वाकड : शंभरपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला त्याच्या साथीदारासह वाकड पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. दोन्ही आरोपींकडून टाटा कंपनीचा एक छोटा हत्ती, टाटा 207 क्रेन, गॅस कटर साहित्य असा एकूण 3 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. राजू जावळकर (वय 50, रा.कोल्हेवाडी, ता.हवेली), सोमनाथ चौधरी (वय 32 रा. भेकराईनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
क्रेन देखील चोरीची
वाकड पोलीस ठाण्यात फेब्रुवारी 2018 मध्ये एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये टाटा कंपनीचा छोटा हत्ती (एम एच 12 / एफ डी 6423) हा टेम्पो चोरीला गेला होता. या गुन्ह्याची माहिती मिळवून हा टेम्पो खेड शिवापूर येथे असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याठिकाणी जाऊन शोध घेतला असता एका शेड मध्ये हा टेम्पो उभा केलेला दिसला. तसेच त्यावेळी दोन्ही आरोपी गॅस कटरच्या साहाय्याने हा टेम्पो कट करत असल्याचे आढळून आले. त्यावरून दोन्ही आरोपींना टेम्पोसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा टेम्पो रहाटणी बीआरटी रोडवरून चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली. त्यांचा आणखी एक साथीदार सध्या फरार आहे. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांच्याकडे चोरीचे वाहन वाहून नेण्यासाठी क्रेन असल्याचे समजले. तो क्रेन देखील आरोपींनी इंदापूर येथून चोरी केलेली आहे. ठराविक दिवसांनंतर त्या वाहनाची भंगारात विल्हेवाट लावत असत. अटक केलेले दोन्ही आरोपी सराईत आहेत. त्यातील राजू जावळकर याच्यावर पुणे शहर, सातारा, नगर येथे 100 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तर सोमनाथ चौधरी याच्यावर 20-25 वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईममुळे चिखली पोलीस ठाण्यातील दोन, वाकड, इंदापूर, चाकण, तळेगाव दाभाडे, कराड शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सात वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.