सराईत गुन्हेगारांकडून पिस्तूल, काडतूस जप्त

0

निगडी : गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, सापळा रचून निगडी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. या कारवाईत दोन्ही गुन्हेगारांकडून एक पिस्तूल, रिव्हॉल्वर व जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्रीनंतर निगडीतील अंकूश चौकात करण्यात आली. शहरात वाढणार्‍या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ केली आहे. गस्ती दरम्यान ही कारवाई झाली. सम्या ऊर्फ समीर लहू सरोदे (वय 23, रा. राजहंस सोसायटी, अंकूश चौक, ओटा स्कीम, निगडी), किरण उर्फ धन्या लाला कांबळे (वय 30, रा. संजयनगर, ओटा स्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दोघेही आरोपी सराईत
पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रात्री एकच्या सुमारास समीर हा अंकूश चौकात त्याच्या साथीदारासोबत थांबला असून, त्यांच्याजवळ पिस्तूल आहे. ही बातमी मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलीस व आरोपींची नजरा-नजर होताच; आरोपी पळायला लागले. मात्र, पोलिसांनी चारही बाजूंनी घेरून त्यांना पकडले. त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक रिव्हॉल्वर व जिवंत काडतूस असा 85 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपी सराईत असून त्यांच्यावर चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच खंडणी मागणे, असे गंभीर आरोप आहेत.