सराईत गुन्हेगारांकडून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी तसेच पुणे ग्रामीणच्या हद्दीत घरफोड्या आणि वाहनचोर्‍या करणार्‍या सराईत गुन्हेगाराला पिंपरी ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 412 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 400 ग्रॅम चांदीचे दागिने, 4 लॅपटॉप, 2 कॅमेरे, मोत्याच्या व खड्याच्या माळा असा एकूण 13 लाख 91 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अल्पवयीन वाहन चोराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 3 लाख 80 रुपये किमतीच्या 12 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच बीड येथील सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून घरफोडीतील 55 हजार 750 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

तळेगाव दाभाडेचा आरोपी
ज्ञानेश्वर दिगंबर मेरुकर (वय 22, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याला पिंपरी गाव येथील पवनेश्वर टी स्टॉल येथून अटक करण्यात आली. त्याने केलेले पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4, वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4, सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 3, भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2, निगडी, देहूरोड, लोणावळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येकी एक असे एकूण 16 गुन्हे उघडकीस आणण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे.

बीडच्या आरोपीकडून तीन गुन्हे
तालिब रफिक बेग (वय. 45, रा. बीड) याच्याकडून पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरफोडी केल्याचे उघडकीस आले असून त्याच्याकडून तीन गुन्ह्यातील 55 हजार 750 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पिंपरी परिसरात वाहन चोरी करणार्‍या चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 12 गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याच चोरट्यांनी पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 5, भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2, निगडी सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येकी 1 दुचाकी चोरल्या असून तीन दुचाकी कोठून चोरल्या आहेत हे अद्याप समजू शकले नाही.