सराफा बांधवांना गंडा घालणारा बंगाली कारागीर जाळ्यात

जळगाव : मारोती पेठ येथील सोने चांदीचे दागिने बनविणार्‍या दोन व्यापार्‍यांची 5 लाख 74 हजारांमध्ये फसवणूक केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयीत बंगाली कारागीराला पंजाब राज्यातील भटिंडा येथून शनीपेठ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 16 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बापन मंटू कारक (28, रा. पश्चिम बंगाल, ह.मु. मारोतीपेठ जळगाव) असे फसवणूक करणार्‍या संशयीत आरोपीचे नाव आहे.

दोघा व्यावसायीकांना घातला गंडा
मारोतीपेठ येथील रहिवासी सुशांत तारकनाथ भुतका (42) यांच्याकडे बापन कारक सुवर्ण कारागीर म्हणून कामास होता. त्याने भुतका यांच्याकडून दोन लाख 60 हजार रुपये घेतले होते तसेच दीपक संघवी या सराफ व्यावसायिकाकडून दागिने बनवण्यासाठी घेतले होते. दोघांची पाच लाख 74 हजार रुपयांची फसवणूक करीत बापन हा पाच दिवसांपूर्वी शहरातून बेपत्ता झाला होता. तो भटिंडा येथे चुलत भावाकडे असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांनी काढली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, रवींद्र बोदवडे, अमोल विसपुते, राहुल घेटे यांचे पथक भटींडाला गेले. बापन हा तेथे एका सराफ व्यावसायिकाकडे कामाला लागला होता. पोलिस आल्याचा सुगावा लागताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी दोन-अडीच तास पाठलाग करून अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपीला सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता 16 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.