जळगाव । सराफ असोसिएशन जळगाव शहर, शनिपेठ व पोलीस प्रशासनाची सुसंवाद बैठक बुधवार रोजी रथ चौकातील बालाजी मंदिरात सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली होती. याबैठकी सराफ व्यावसायिकांनी पोलिसांसमोर त्यांच्या समस्या व अडचणी मांडल्या. या बैठकिला अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच मंचावर उपपोलीस अधीक्षक सचिन सांगळे, शनीपेठ पोलीस ठाण्याचे पो.नि. प्रविण वाडीले, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी धनंजय पाटील, सराफ असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गौतम लुणीया (जैन) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात गौतम लुणीया यांनी सुभाष चौकातील अतिक्रमण काढुन मार्ग मोकळा करावा, सुभाष चौक ते रथ चौक हा मार्ग कधी एकेरी मार्ग होता. तसा पुन्हा एकेरी मार्ग करावा. कोणत्या व्यापार्यांची चौकशी करायची असल्यास असोसिएशनला सांगावे. आम्ही त्याला पोलीस ठाण्यात घेवून येवू. पोलीसांची गाडी थेट नेवू नये. तसेच रथ चौक ते भवानी मंदीरा दरम्यान उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
सुभाष चौक पोलीस चौकीत कायम कर्मचारी ठेवावेत, व्यापारी व कारागीरांना ओळखपत्र द्यावे, बंगाली कारागीरांकडून सार्वजनिक उत्सवांसाठी देणगी जबरदस्ती वसूल केली जाते. पोलीस व व्यापार्यांचा सोशल मिडीया गृप तयार करावा, अशा सुचना मांडण्यात आल्या.व्यापार्यांच्या सुचनांवर अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग व उपपोलीस अधीक्षक सचिन सांगळे यांनी प्रतिसाद देतांना असोसिएशननेच कारागीरांना व व्यापार्यांना ओळपत्र उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी त्यांची आवश्यक माहिती गोळा करून घेवून संकलीत करावी. जे लोक किंवा मंडळ सार्वजनिक उत्सवाची देणगी जबरजस्तीने घेतली त्यांची माहिती द्यावी. त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल.स्वत:च्या सुरक्षेची काळजी स्वत:घ्यावी. जे व्यापारी सुरक्षेत कुचराई करतात किंवा त्यांची सुरक्षा यंत्रणा कमजोर असते. अशाच ठिकाणी चोरटे लक्ष केंद्रीत करतात असे त्यांनी सांगीतले.