सरी जि.प शाळेचे विद्युतबील लोकसहभागातून भरले

0

नवापूर । तालुक्यातील सरी जि.प.शाळा येथील शिक्षक व केंद्रप्रमुखांसह लोकवर्गणी जमा करून थकीत वीज बिल भरण्यात आले. यात लोकवर्गणी 2420/- रुपये, शिक्षक व केंद्रप्रमुखांनी 2000/- रुपये असे एकूण 4420/- रुपये वीज बील भरून विद्युत प्रवाह सुरु ठेवला. मागील 3 वर्षातील लोकसहभागातून 5 वा उपक्रम जि.प.शाळा सरी येथे राबविण्यात आला. डिसेबर 2016 मध्ये मागील 8 वर्षापासून बंद असलेला विद्यूत प्रवाह 4900/- रुपये लोकसहभागातून व शिक्षकांच्या आर्थिक योगदानातून भरून नवीन मीटर बसवून सुरु केला होता. तेव्हापासून आज अखेरचे 4420/- रुपये विद्यूत बील थकीत होते.

शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निर्णय
काही दिवसांपूर्वी विद्युत बील न भरल्यास पुन्हा विद्युत मीटर काढून घेणार असल्याचे विद्युत वितरण कंपनी कडून सांगण्यात आले. तेव्हा पुन्हा शाळेतील डिजिटल साहित्य बंद पडणार व विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी शाळेतील शिक्षक व केंद्रप्रमुखांनी शाळा व्यवस्थापन समितीशी हितगुज केले व लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन केले. पालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत 2420/- रुपये लोकवर्गणी जमा केली व उर्वरित रक्कम दोन्ही शिक्षकांनी 1500/- रुपये व केंद्रप्रमुखांनी 500/- रुपये देवून एकूण 4420/- रुपये पूर्ण केले व विद्युत बील भरून मीटर काढून घेण्यापासून वाचवले. पालकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल केंद्रप्रमुख मंगला पाटील, मुख्याध्यापक बालकिसन विठ्ठल ठोंबरे व उपशिक्षक शिवदास गुना पावरा यांनी पालकांचे विशेष आभार मानले.