मुंबई-नव्वदच्या दशकात आघाडीच्या अभिनेत्रींना आपल्या तालावर नाचवणा-या बॉलिवूडच्या लोकप्रिय कोरिओग्राफर सरोज खान यांच्याकडे सध्या काम नसल्याचे ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. एकेकाळी सरोज खान बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय कोरिओग्राफर होत्या. पण एकवेळ अशी आली की, कुणी त्यांना काम देईनासे झाले. अशावेळी बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान त्यांच्या मदतीला धावून आला आहे.
एका मुलाखतीत सरोज खान यांनी ‘अलीकडे मी सलमान खानला भेटले. तुम्ही सध्या काय करत आहात? असे सलमानने मला विचारले. मी अतिशय प्रामाणिकपणे, माझ्याकडे सध्या कुठलेही काम नसल्याचे त्याला सांगितले. काम नसल्यामुळे काही नव्या अभिनेत्री बनू इच्छिणा-या मुलींना क्लासिकल डान्स शिकवते, असेही मी त्याला सांगितले. यावर सलमान एकक्षण थांबला आणि आता तुम्ही माझ्यासोबत काम करणार, असे मला म्हणाला. सलमान दिलेला शब्द पाळतो, हे मला माहित आहे. मला दिलेला हा शब्दही तो पाळेल,असा मला विश्वास आहे,’ असे सरोज खान यांनी या मुलाखतीत सांगितले.
यावरून सरोज खान सलमानच्या ‘दबंग 3’या आगामी चित्रपटासाठी काम करू शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे. सलमानने सरोज खान यांच्यासोबत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बीबी हो तो ऐसी, बीवी नंबर 1, अंदाज अपना अपना अशा अनेक चित्रपटात सरोज खान या कोरिओग्राफर होत्या. गतवर्षी रिलीज झालेल्या आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटातील कॅटरिना कैफवर चित्रीत गाणे आधी सरोज खान कोरिओग्राफ करणार होत्या. पण कॅटरिनाने म्हणे, त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला. यानंतर प्रभुदेवाने हे गाणे केले होते.