नवी दिल्ली : भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. छत्तीसगडमधून सरोज पांडे यांना उमेदवारी मिळाली आहे. सरोज पांडे यांच्यासोबतच अनिल बलुनी, जीव्हीएल नरसिंहा या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनाही राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. राज्यसभेच्या खासदारकीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत सोमवारी संपणार आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेसची यादी रविवारीच जाहीर झाली.
महाराष्ट्रातून सहापैकी चार नावे जाहीर झाली आहेत. भाजपने एकूण नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यामध्ये सर्व केंद्रीय मंत्र्यांचा समावेश होता. महाराष्ट्रातून भाजपकडून प्रकाश जावडेकर आणि नारायण राणे अशी दोन नावे जाहीर झाली आहेत. नारायण राणे आज सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्रातून शिवसेनेकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर भाजपकडून जावडेकर आणि नारायण राणे अशी चार नावे जाहीर झाली आहेत.