वॉशिंग्टन : भारतीय लष्कराने सीमारेषा ओलांडून शत्रूराष्ट्रातील दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराच्या या कारवाईवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकले नाही. भारत स्वत:चे संरक्षण स्वत: करू शकतो, हे लष्कराने हा हल्ला यशस्वी करून जगाला दाखवून दिले आहे. भारताची भूमिका कायम संयमाची राहिली आहे. मात्र, ज्यावेळी आवश्यकता असेल, त्यावेळी भारत आपल्या शक्तीचे दर्शन घडवू शकतो. या सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून भारताचे सामर्थ्य जगाला दिसले, असे वक्तव्य करत अमेरिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान आणि चीनला अप्रत्यक्षपणे इशारा दिला. सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी व्हर्जिनियातील टायसन्स कॉर्नरमधील रिर्ट्झ कार्लटन येथे भारतीयांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारताच्या विकासाचा पाढा वाचला.
20 वर्षांपूर्वी दहशतवाद मांडला होता
भारत अनेकदा दहशतवादी हल्ल्यांना बळी पडला आहे, दहशतवादाचे परिणाम किती भयंकर असू शकतात. हे भारतात 20 वर्षांपूर्वी जगाला सांगितले होते. मात्र, त्यावेळी या विषयाकडे जगातील अनेक देशांनी केवळ कायदा आणि सुव्यवस्थेच्या नजरेतून पाहिले. या समस्येकडे कोणीही दहशतवादाच्या दृष्टिकोनातून पाहिले नाही. परंतु, दहशतवाद काय असतो हे आता दहशतवाद्यांनीच सर्व जगाला सांगितले आहे. म्हणून आता दहशतवाद काय असतो, हे जगाला सांगण्याची गरज उरलेली नाही’, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारत हा जागतिक नियम मानणारा देश आहे. जगाच्या नियमांच्या चौकटीत राहूनच आम्ही ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. भारताने कायम विकासाचा मार्ग धरला आहे. जागतिक नियमांच्या चौकटीत राहणे हा भारताचा इतिहास असून, तीच भारताची संस्कृती आहे’, असे म्हणत भारतीय दक्षिण चिनी समुद्रात चीनकडून सुरू असलेल्या दांडगाईवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले.
मोदींच्या अमेरिका दौर्यावर पाकची नजर
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये परदेशी पाहुण्यांसोबत एकदाही स्नेहभोजन केले नाही. सोमवारी मोदी यांच्यासोबत ट्रम्प यांनी प्रथमच स्नेहभोजन केले. दरम्यान, पाकिस्तानची या संपूर्ण दौर्यावर नजर आहे. कारण या भेटीआधी ट्रम्प यांनी मोदींना ‘खरा मित्र’ म्हटले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कालपर्यंत पाकिस्तानला अमेरिकाकडून झुकते माप मिळायचे, मोदींच्या दौर्यामुळे यात बदल होईल का, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे.
सुषमा स्वराजांचे कौतुक
‘भारतीयांच्या अडचणी सोडवण्यासाठी सुषमा स्वराज यांचे परराष्ट्र मंत्रालय सोशल मीडियाचा अतिशय प्रभावीपणे वापर करते. सोशल मीडिया खूपच शक्तिशाली माध्यम आहे. मीदेखील त्याच्याशी जोडला गेलो आहे. पण परराष्ट्र मंत्रालय आणि सुषमा स्वराज यांनी याबाबत एक आदर्श निर्माण केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही मंत्रालयाला आणखी बळकटी देता येऊ शकते, असेही मोदी म्हणाले.