सर्दीवर उपाय सापडतोय

0

लंडन – पृथ्वीवर सर्वच देशांमधील लोकांना होणारा आजार म्हणजेच सर्दी. जंग जंग पछाडले तरी शास्त्रज्ञांना या आजारावर उपायच सापडत नव्हता. शेवटी डॉक्टरही म्हणू लागले की औषधे घेतलीत तर सात दिवसात सर्दी बरी होईल आणि नाही घेतलीत तर आठवड्यात. आता मात्र ब्रिटन मधील शास्त्रज्ञांना या विषाणुजन्य आजारावर उपाय नजरेच्या टप्प्यात आलाय असं वाटतं आहे.

एडिनबर्ग नेपिअर विद्यापीठात वैज्ञानिकांचा सर्दीच्या राईनो या विषाणुचा अभ्यास गेली पाच वर्षे सुरू होता. स्तन्य प्राण्यांच्या शरीरातून वैज्ञानिकांनी पेप्टाईड म्हणजेच अमिनो एसिडच्या रेणुंची श्रृंखला असलेले संयुग काढले. त्यांना दिसून आले की पेप्टाईडमध्ये सर्दीच्या जीवाणुंशी लढण्याची ताकद असते.

विषाणुंना नेस्तनाबुत करणाऱ्या रेणुंच्या क्षमतेमुळे सर्दीपासून सुटकारा मिळेल, असे वैज्ञानिकांना वाटत आहे. हया शोधामुळे दम्याचा त्रास असणाऱ्यांना व फुफुसाच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

एका आकडेवारीनुसार माणसाला आयुष्यात कमीत कमी २०० वेळा सर्दी होते. लहान मुलांना सर्दी जास्त होते. सध्या तरी सर्दी वर औषध नाही. सर्दीवर डॉक्टर वेदनाशामक गोळ्या आणि प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) देत असले तरी तरी खरे औषध अदयापही सापडलेले नाही.