ओतूर । मढजवळील तळेरान येथे भातशेतात खताचा मारा करण्याचे काम करीत असताना नागाने दंश केल्यामुळे एका शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. होनाजी शंकर कारभाळ (वय 42) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
होनाजी कारभळ हे शेतात खताचा मारा करीत असताना त्यांचा पाय नागावर पडला. त्यामुळे नागाने त्यांना दंश केल्याचे कळले. शेतात काम करीत असलेला त्यांचा भाऊ शंकर त्यांच्या मदतीला धावला. त्वरित त्यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, होनाजी जास्त अत्यवस्थ असल्याने तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना पिंपरी चिंचवड येथे हलविण्यात आले. परंतु, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पावसाळ्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात मोठ्या संख्येने आदिवासी भागात सर्पदंशाचे प्रमाण वाढते. सर्पदंशाचे योग्य उपचार होत नसल्याने रुणांची गैरसोय होत असते. सध्या पावसामुळे व गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीअभावी रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यात अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ग्रामीण रुग्णालयांपर्यंत जाणेदेखील कठीण होते. यामुळे सध्या आदिवासी भागांमध्ये रुग्णांची गैरसोय होत आहे. रस्त्यांच्या दुर्दशामुळे व योग्य उपचारांअभावी होना कारभळ यांचा मृत्यू झाला.