जळगाव – धरणगाव तालुक्यातील चोरगाव शेत शिवारात विषारी साप चावल्याने १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. बालकास तात्काळ खाजगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, त्याला मयत घोषित करण्यात आले. याबाबत प्रत्यक्षदर्शीं नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, चोरगाव शेत शिवारात पाळधी येथील डॉ. शास्त्री यांचे शेत आहे. या शेतात वर्षभरापासून मध्यप्रदेशातील दुगानी येथील भायला पावरा हे सालदारी करतात. त्याचा शालक व मुलगा रोहीत वय १२ हे शेतात काम करीत होते. दुपारी अचानक रोहीत याला विषारी सापाने चावा घेतला. यावेळी रोहीत याने आरडाओरड केली. यावेळी त्याच्या मामा याने याठिकाणी धाव घेतली असता, तो पडलेला दिसून आला. त्याला तात्काळ खाजगी वाहनाने उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. खेताडे यांनी त्याला तपासणीअंती मयत घोषित केले. यावेळी त्याच्या कुटुंबिंयांनी एकच आक्रोश केला.