जळगाव । तालुक्यातील भोलाणे येथे नुकतेच सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे अजगर व एका सापाला जीवदान मिळाल्याची घटना घडली. भोलाणे येथील एका इसमाच्या शेतातील विहिरीत मागील तीन दिवसांपासून एक अजगर व तस्कर जातीचा साप पडलेले होते. याबाबत वन्यजीव संस्थेच्या सर्पमित्रांना माहिती मिळाल्यानंतर सर्पमित्रांनी आपले कर्तव्य पार पाडत धोकादायकरित्या विहिरीमध्ये उतरत या दोन्ही सापांना सुखरूप बाहेर काढले.
यापैकी तस्कर जातीचा साप सुखरूप असून अजगरावर दुखापतीमुळे वन्यजीव संस्थेच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत. या दोन्हीही सापांना जीवदान मिळवण्यासाठी पंकज बविस्कर,राहुल सुरळकर, सागर सोनार,गोकुळ कोळी, योगेश सपकाळे,प्रवीण सोनवणे, अमोल सपकाळे, हर्षल सपकाळे, आकाश धनगर, लक्ष्मण रायसिंग आदी सर्पमित्रांनी यशस्वी मेहनत घेतली. सर्पमित्रांच्या या कामगिरीचे वन्यजीव संस्था व परिसरातून कौतुक होत आहे.