सर्पमित्रांच्या सतर्कतेने थांबली नर घोरपडची शिकार

0

भुसावळ : घोरपड विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांना मिळाल्यानंतर संस्थेचे कार्यकर्ते वरणगाव रस्त्यावर लक्ष ठेवून होते. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान दीपक नाटेकर हे स्नेक रेस्कुसाठी गेले असता काही लोक रस्त्याच्या कडेला पिशवी घेऊन बसल्याचे दिसल्यानंतर त्यांनी माहिती काढली असता घोरपड विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली व आपल्या सहकार्‍यांना त्यांना अलर्ट केल्यानंतर घोरपडीची सुटका केली मात्र शिकारी पदाधिकारी दाखल होताच पसार होण्यात यशस्वी झाले.

शिकार्‍यांनी ठोकली धूम
दीपक नाटेकर यांना तीन व्यक्तींजवळ एका पिशवीत घोरपड असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शिकार्‍यांचा विश्‍वास संपादन करीत घरी दाखवण्यासाठी घोरपडीचा फोटो पाठवतो, असे सांगून बाळकृष्ण देवरे यांना माहिती दिली व इकडे घोरपडीचा सौदाही दोन हजार 500 रुपयात ठरवण्यात आला. देवरे यांनी संस्थेच्या ‘कंट्रोल रूम’ या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर घोरपडीबाबत माहिती टाकत दीपक एकटे असल्याने त्यांना मदतीसाठी सहकार्‍यांनी जावे असे कळवले. दीपकक यांनी वनक्षेत्रपाल बच्छाव यांच्याशी संपर्क साधला मात्र तो होवू शकला नाही तर कुठलीही कारवाई वनविभागाच्या माहितीतच करावी हा संस्थेचा नियम असल्याने त्यांनी 1926 या वनविभागाच्या तक्रार हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती दिली. यावेळी वनविभागाचे वनरक्षक गवळी यांनी दीपक यांच्याशी संपर्क साधला तसेच मुंबई वनविभागामार्फतदेखील माहिती घेण्यात आली मात्र हे सर्व सुरू असताना घोरपड विक्रेत्यांना संशय आला व वेळ कमी असल्याने आणि विक्रेते पसार होण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात येताच दीपक यांनी त्यांच्यावर झडप घालत घोरपड असलेली पिशवी ताब्यात घेतली व अन्य दोघा शिकार्‍यांनी ही पिशवी हिसकवण्यासाठी झटापट केली असता संस्थेचे रवी तायडे घटनास्थळी पोहोचले. शिकार्‍यांवर शस्त्र असू शकते हा अंदाज आल्याने त्यांना घाबरवण्यासाठी येथे अजून कार्यकर्ते आणि वनविभागाचे अधिकारी येत असल्याचे सांगून ते पुढे सरकताच शिकार्‍यांनी मात्र धूम ठोकली.

जखमी घोरपडीवर केले उपचार
पदाधिकारी व शिकार्‍यांच्या झटापटीत सुदैवाने घोरपड पळवता न आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. दीपक नाटेकर यांनी 1926 या क्रमांकावर संपर्क साधून नर जातीची घोरपड ताब्यात घेतल्याची माहिती दिली तसेच शिकार्‍यांनी घोरपड पकडताना तिला शेपटीवर किंवा डोक्यावर दणका मारून जखमी केल्याने शनिवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी तायडे यांच्याकडे तिची वैद्यकीय तपासणी केली असता घोरपडीची नखे काढण्यात आल्याचे देखील दिसून आले व उपचार करून सुस्थितीत आल्यावर ही घोरपड वनविभागाच्या निर्देशाने सुरक्षित अधिवासात सोडण्यात आली, असे दीपक नाटकेर यांनी सांगितले.

अन्नात वन्यजीवांचा वापर टाळा
घोरपडीच्या बाबतीत अनेक अंधश्रद्धा असून तिचे मांस खाण्याने किंवा कोणताही अवयव वापरून कोणताच फायदा होत नाही उलट अश्या वन्य प्राण्यांच्या मांसात असलेले परजीवी आपल्या शरीरात दाखल होऊन वेगवेगळे विषाणूजन्य आजार पसरवतात व याच प्रकारच्या काही विषाणूंचा जीवघेणा प्रकोप सध्या संपूर्ण जग भोगत असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे यांनी दिली. नागरीकांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व आपल्या अन्नात वन्यजीवांचा वापर टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

यांच्यामुळे वाचले घोरपडीचे प्राण
घोरपडीचे प्राण वाचवण्यासाठी वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, दीपक नाटेकर, रवी तायडे, अ‍ॅलेक्स प्रेसडी, गौरव शिंदे, विजय रायपूरे, सतीश कांबळे, स्कायलेब डिसुझा, जयेश चौधरी, राहुल आराक, धीरज शेकोकारे यांचे सहकार्य लाभले तर वनपाल एल.डी.गवळी, वनरक्षक एम.जी.बोरसे यांचे मार्गदर्शन ही लाभले.