नवी दिल्ली । सर्बियामध्ये अपहरण करण्यात आलेल्या भारतीयाची सुटका व्हावी म्हणून त्याच्या भावाने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची याचना केली होती. मात्र, अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तिचा शोध घेताना, ज्या ध्वनीचित्रफितीद्वारे त्याला शोधण्यात येत होते ती ध्वनीचित्रफीत खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजीव नावाच्या तरुणाने आपल्या भावाच्या सुटकेसाठी सुषमा स्वराज यांच्याकडे ट्विटरद्वारे मदत मागितली होती. सर्बियामध्ये त्याचे अपहरण करण्यात आले आहे, अशी माहिती त्याने स्वराज यांना दिली तसेच अपहरणकर्त्यांना पैसे नाही दिले तर ते त्याचा जीव घेतील असेही त्याने स्वराज यांना सांगितले. त्याचबरोबर त्याने यासोबत ध्वनीचित्रफीत पाठवली होती. मात्र, ही ध्वनीचित्रफीत खोटी असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले. त्यावेळी राजीव तुमचे बंधु सुखरुप आहेत. त्यांनी स्वत:च स्वत:चे अपहरण करण्याचे नाटक रचले होते, असे ट्विट सुषमा यांनी ट्विटरद्वारे सांगितले.