तळोदा पालिका निवडणूकीपूर्वीच भाजपासोबतच काँग्रेसमध्ये देखील पक्षांतर्गत मतभेद दिसून येत असून पालिका निवडणूकीत महत्वाच्या भूमिकेत असणारे काँग्रेस भाजप या दोघा प्रमुख पक्षांचा जेष्ठ,तरुण नेतृत्व व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसल्याने शहरातील राजकारण झपाट्याने बदलत असून तळोदा शहरात सर्वच पक्षांना अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागले असल्याचे बोलले जाते.तळोदा शहराचा आजपर्यंतचा पालिकेचा इतिहास पाहिल्यास काँग्रेस अथवा काँग्रेसप्रणित आघाडी यांची सत्ताच अधिक काळ पालिकेवर राहिली आहे. मात्र माजी क्रीडामंत्री पदमाकर वळवी यांना मागील पंचवार्षिक निवडणुकीत पालिकेत काँग्रेसची सत्ता असतांना देखील अपेक्षेकृत मतदान तळोदा शहरातून काढण्यात शहरातील काँग्रेसला अपयश का आले याबाबत वळवी यांनी काही दिवसांपूर्वी उघड खंत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांजवळ व्यक्त केल्याची चर्चा आहे.आता मात्र येणार्या निवडणुकीत पदमाकर वळवी यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसकडून उमेदवारी देतांना उमेदवार कोण असतील याचे अधिकार स्वतःकडे ठेवणार असल्याची चर्चा असून स्वतःच्या मर्जीतील उमेदवारांना डावलले जाईल अशी शंका असल्याने अपेक्षाची तयारी करून स्वबळावर तयारी करून ठेवली जात असल्याचे बोलले जाते.
वरचढ कोण काँग्रेस की भरत माळी ?
भरत माळी यांनी या अगोदर देखील स्वबळावर निवडणूक जिंकिली आहे शहरात त्यांचा दांडगा संपर्क तसेच सर्वच समाजातील तरुण व जेष्ठ लोकांशी त्यांनी संपर्क ठेवला आहे यामुळ काँग्रेसच्या चिन्हाचा वापर न करता त्यांनी निवडणूक लढविल्या आहेत. त्यात त्यांनी काँग्रेसची कोणताही मदत न घेता स्वतः राजकीय ताकद या अगोदरच सिद्ध केली होती मात्र मागील पंचवार्षिकला त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर आपला उमेदवार उभे करून पदमाकर वळवी यांच्या नेतृत्वात यश मिळवले होते त्यामूळे आता शहराचा विचार केला तर काँग्रेस म्हणजे भरत माळी असे समीकरण मागील काळात निदान पालिका निवडणुकीत दिसून आले आहे त्यामुळे आपली राजकीय ताकद पुन्हा पालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून माळी यांनी सिद्ध केली तर आश्चर्य वाटायला नको तर काँग्रेस पक्षाचा शहरातील एकूण संघटनेकडे बघितले असता काँग्रेस कडे भरत माळी सोडून सक्षम पर्याय आज तरी उपलब्ध नाही हे कटू सत्य आहे.
भाजपमध्ये आमदार विरुद्ध पदाधिकारी
तळोदा भाजपमध्ये गटबाजी पक्ष श्रेष्ठीकडून आवरता आवरली जात नसून जिल्हातील उघड दोन गट आहेतच. मात्र तळोद्यातील भाजपमध्ये मागील काळापासून अंतर्गत कलह वाढतच असल्याचे दिसून येत आहे. यात आमदार उदयसिंग पाडवी यांच्यासोबत शहर अध्यक्ष हेमलाल मगरे तसेच युवा उपाध्यक्ष शिरीष माळी यांच्यासह इतर काही कार्यकर्ते यांच्यात सख्य वाढले असून उघड दोन गट दिसून येत आहेत. दुसर्या गटात तळोदा शहरातील भाजपचे पदाधिकारी प्रदेशकार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी, विधानसभा क्षेत्रप्रमुख अजय परदेशी, जिल्हा सरचिटणीस प्रा विलास डामरे,तालुकाध्यक्ष राजेन्द्र राजपूत,जिल्हाउपाध्यक्ष रुपसिंग पाडवी, माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी यांचासह काही इतर कार्यकर्ते एक गट तयार झाला आहे. त्यामुळे तळोद्यात पालिका निवडणूकपूर्वी मोठ्या राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे.
पर्यटनमंत्री रावळ व माळी भेट टळली
शहरात तालुका क्रीडासंकुल व उपजिल्हारुग्णालय येथे लोकार्पणप्रसंगी पर्यटनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावळ हे कार्यक्रमानंतर काँग्रेसचे गटनेता भरत माळी यांच्या पक्ष बाजूला सारून एक मैत्रीखातर सदिच्छा भेट आमदार उदयसिंग पाडवीसोबत देणार होते. मात्र भरत माळी त्यादिवशी बाहेर गावी असल्याने भेट टळली मात्र या भेटी बाबत इतर भाजपच्या पदाधिकारी या भेटी बाबत भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे केल्याने ही भेट टळली तरी ही भेट तळोदा शहराचे राजकारण कोणते दिशेला जात आहे याबद्दल भाजप गोटात एकच जोरदार चर्चा आहे.
शिवसेना सतत प्रकाशझोतात
आपल्या आंदोलनातून सतत विविध प्रश्नांवर लोकांचे प्रश्न मांडण्यात शिवसेना इतर पक्ष तुलनेत पुढे दिसते. मात्र पोषक वातावरण असून देखील पक्ष संघटनेत पालिका निवडणूकीपुर्वी अपेक्षित वाढ झालेली दिसत नाही. तसेच अंतर्गत कुरबुरी पदाधिकारी यांच्यात सुरूच असते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरात निवेदनापुरते देखील अस्तित्व दिसून येत नाही.
गट स्थापनेबाबत चर्चा
शहरात एक दिगग्ज नेता पक्षाच्या श्रेष्ठीकडून तिकीट वाटपात एकूण सर्वच जागेवर उमेदवार देतांना जर आपल्या जवळील इच्छुक उमेदवारांना संधी नाही मिळाली तर स्वतः चा एक वेगळा गट तयार करून आपली राजकीय ताकद दाखविण्यास सज्ज असल्याची चर्चा आहे
पक्ष प्रवेश चर्चा
तळोदा पालिका निवडणूकीच्या भूमिगत राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून तळोदा शहरातील राजकीय शक्तिकेंद्र असणार्या काँग्रेसचे भरत माळी यांचे भाचे कल्पेश माळी यांचे देखील नाव भाजपच्या इच्छुकांच्या यादीत आहे.त्यांची आई प्रभावती माळी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदावर मागील 10 वर्षापासून आहेत. तसेच भरत माळी यांचे मोठे बंधू लक्ष्मण माळी यांचे चिरंजीव जितेंद्र सूर्यवंशी यांचा देखील भाजपच्या प्रवेशाबद्दल चर्चा असून कल्पेश माळी हे विद्यमान आमदार यांच्याशी कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे अतिशय जवळचे संबधित आहेत.तर जितेंद्र माळी यांचा देखील कोरी पाटी म्हणून भाजपचा आमदार गट विचार करू शकतो.त्यामुळे आमदारांचा कोटयातून त्यांना तिकीट मिळू शकते असे बोलले जाते.
भाजपामध्ये दिग्गजांची मोर्चे बांधणी
राज्यात व केंद्रात सत्ता असल्यामुळे तसेच शेजारील शहादा तालुक्यात थेट नगराध्यक्ष निवडणूकीत भाजपाला यश मिळाल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. यात काही दुसर्या पक्षाच्या नगरसेवकांना देखील भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे तिकीट मिळणार असे स्वप्न पडत आहे. मात्र सध्या तरी प्रमुख दावेदार म्हणून डॉ. शशिकांत वाणी व अजय परदेशी व हेमलाल मगरे यांची नावे चर्चेत आहेत. यात जिल्हाध्यक्ष व खासदार हिनाताई गावित काय निर्णय घेतात व त्या निर्णयाला आमदार पाडवी कसा राजकीय प्रतिसाद देतात यांवर भाजपचे यश अपयश अवलंबून आहे.
– सुनिल सुर्यवंशी, तळोदा
9421887715