सर्वधर्मियांच्या सहभागाची लष्कर भागातील मिरवणूक

0

पुणे । लष्कर भागातील विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ भोपळे चौकातील मानाचा पहिला गणपती कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासमोर राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आला. सर्व धर्मियांचा उत्साही सहभाग ही या भागातील मिरवणुकीचे वैशिष्ट असते. आकर्षक सजावटीमध्ये आपली मंडळामध्ये श्रींची मूर्ती सजली होती. सिंहगर्जना पथकाच्या वादनाने मिरवणुकीला रंगत आणली. यावेळी लष्कर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुंवर, कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र कुर्‍हे आदी उपस्थित होते.

भीमपुरा गल्लीमधील श्री राजेश्वर तरुण मंडळ, कोळसेगल्लीमधील नवमहाराष्ट्र व्यायाम मंडळ , ताबूत स्ट्रीटवरील ताबूत स्ट्रीट तरुण मंडळ, राणी लक्ष्मीबाई उद्यानाजवळील शिवमुद्रा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भवानी पेठेमधील श्री. शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट, भोपळे चौकातील श्रीमंत साईनाथ तरुण मंडळ, हिंद तरुण मंडळ, शिंपी आळीमधील नवयुग तरुण मंडळ, गाडीअड्डा येथील शिव तरुण मंडळ ट्रस्ट, कुंभारबावडी तरुण मंडळ, कुंभारबावडी स्थायिक सेवा सेवा मंडळ, जाफरीन लेनमधील नवयुग सुवर्णकार तरुण मंडळ, नवा मोदीखानामधील विश्‍व तरुण मंडळ, कमलमळामधील शिवशक्ती कमलमळा तरुण मंडळ, नवा मोदीखानामधील उत्सव संवर्धक खाण्या मारुती देवस्थान मंडळ ट्रस्ट, शंकरशेठ रोडवरील धोबीघाट मित्र मंडळ ट्रस्ट आदी मंडळ सहभागी झाले होते.

यंदा श्री दत्त समाज तरुण मंडळ, श्रीपाद तरुण मंडळ , श्रीकृष्ण तरुण मंडळ , दस्तूर मेहेर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री शिवराम तरुण मंडळ या मंडळांनी जागेवरच विसर्जन केले. तर जय जवान मंडळाने नवयुग तरुण मंडळाबरोबर आपली विसर्जन मिरवणूक काढली. हिंद तरुण मंडळाने देशभक्तीपर नृत्ये सादर केली. यामध्ये शिवांग ढोलपथक सहभागी झाले होते. खाण्या मारुती देवस्थान मंडळ ट्रस्ट फुग्यांची सजावट केली होती. कुंभारबावडी स्थायिक सेवा सेवा मंडळाने शंकर महादेव त्रिशूल देखावा, नवयुग सुवर्णकार तरुण मंडळाने आकर्षक फुलांची सजावट , धोबीघाट मित्र मंडळाने बजरंगबली हनुमान हलता देखावा, विश्‍व तरुण मंडळाने विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमाचा देखावा, श्रीकृष्ण तरुण मंडळाने शिवमहल देखावा सादर केला होता. विसर्जन मिरवणुकीसाठी 1 सहाय्यक पोलीस आयुक्त, 6 पोलिस निरीक्षक, 16 पोलिस अधिकारी, 225 पोलिस कर्मचारी, 15 होमगार्ड, 30 पोलीस मित्र विशेष परिश्रम घेतले.

पूना कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 30 विद्यार्थ्यांनी विसर्जन मिरवणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलीस मित्र म्हणून काम केले. ट्रायलक चौक, गुडलक चौक, कुरेशी मशीद चौक, भोपळे चौक येथे पोलीस मित्र म्हणून त्यांनी काम केले.