सर्वपक्षीय समितीने वस्तुस्थिती मांडायला हवी!

0

रिंगरोड बाधितांची अपेक्षा; ’जागरण शंभरी’ आंदोलनाला लाभला उदंड प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड : महापालिका आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासन घटनाबाह्य अतिक्रमण कारवाई करत असेल तर, रिंगरोड बाधित नागरिक व प्रशासनात तीव्र संघर्ष होऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल. अनधिकृत बांधकामांसंदर्भात राज्य शासनाने प्रारूप नियमावली प्रसिद्ध केली आहे. अनधिकृत घरे अधिकृत करण्यासाठी शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे नियमबाह्य आहे. आता महापालिकेच्या सर्वपक्षीय समितीने वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांकडे मांडायला हवी, अशी अपेक्षा रिंगरोड बाधितांनी व्यक्त केली. प्रस्तावित रिंगरोडला विरोध करण्यासाठी बाधित नागरिक सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत. या लढ्याला 100 दिवस पूर्ण झाल्याने घर बचाव संघर्ष समितीतर्फे रविवारी चिंचवड येथे ‘जागरण शंभरी‘ आंदोलन व आढावा बैठक घेण्यात आली. या आंदोलनास उदंड प्रतिसाद लाभला. लढा अजून तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

रि-अलायमेंटचा विचार व्हावा
रिंगरोड प्रश्‍नाबाबत स्वायत्त संस्थांनी वरिष्ठ सरकारी विधिज्ज्ञांचा सल्ला घेणे क्रमप्राप्त ठरते. घटनाबाह्य कारवाई करणे म्हणजे शासनाच्या अधिसूचनेला ध्याब्यावर बसविल्यासारखेच असेल. रि-अलायमेंट म्हणजेच पर्यायी मार्गाने रिंगरोड वळविण्यात आला, तर हा प्रश्न सहजपणे सुटू शकतो. प्रशासनाने समितीच्या अहवालावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, असे मत यावेळी घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक विजय पाटील यांनी व्यक्त केले.

स्त्री शक्तीचे दर्शन
रेखा भोळे म्हणाल्या की, पहिल्या दिवसापासून परिसरातील सर्व माता-भगिनींनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. स्त्री शक्तीचे दर्शन आंदोलनात दिसून येत आहे. यापुढेही अशाच पद्धतीने आपल्याला एकजूट ठेऊन शेवटपर्यंत लढा द्यायचा आहे. 100 दिवसांच्या लढ्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. यापुढे जागृतपणे आपल्याला संघर्ष सुरूच ठेवावा लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
यावेळी राजेंद्र चिंचवडे, माऊली जगताप, राजेंद्र देवकर, उमाकांत सोनवणे, सचिन काळभोर, रजनी पाटील, शुभांगी चिघळीकर, वैशाली कदम, वैशाली भांगीरे, रेखा राजपूत, सोनाली पाटील, रोहिणी लांडगे, काकी पोहेकर, चंदा निवडुंगे, निकिता पाटील, लक्ष्मण सुरसे, भाऊसाहेब पाटील, आबा राजपूत, गोपाळ बिरारी, मोतीलाल पाटील, मोहन भोळे, प्रदीप पटेल, राजू पवार, गणेश सरकटे, अमोल पाटील, अमर आदियाल, नीलचंद्र निकम, प्रदीप पवार, तानाजी जवळकर, प्रशांत सकपाळ, विशाल पवार, सागर बाविस्कर, संतोष शर्मा, संतोष चिघळीकर, अमोल हेळवर, सुनील पाटील, जितेंद्र पाटील, हनुमंत वाबळे, नाना होले उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले. तर, शिवाजी इबितदार यांनी आभार मानले.