जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमधील सर्वशिक्षा अभियान कार्यालयातील पीओपी व स्लॅब कोसळल्याची घटना घडली.
सर्वशिक्षा अभियान कार्यालयात कर्मचारी काम करत असताना दुपारी पावणेतीनच्या सुमारास लेखाधिकारी पाटील यांच्या केबिनवरील स्लॅबचा काही भाग खाली कोसळला. या घटनेच्या काही वेळ आधी लेखाधिकारी पाटील हे शेजारील कर्मचार्याच्या खुर्चीजवळ गेले होते. या स्लॅबच्या वरच्या मजल्यावर पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे तेथे पाणी साचले होते. ते स्लॅबमध्ये मुरल्याने हा स्लॅब कोसळला. यामुळे टेबलाची काच फुटल्या असून फर्निचरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे निकृष्ट बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.